पुणे शहरातील फरासखाना पोलीस स्टेशनमधील एका कर्मचार्‍यानं दत्तवाडी पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांला जीवे मारण्यासाठी थेट सराईत गुन्हेगारालाच सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सुपारी देण्यात आलेल्या आरोपी सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. मात्र, सुपारी देणारा पोलीस कर्मचारी सध्या फरार झाला आहे. नितीन दुधाळ असं आरोपी पोलीस अमलदाराचं नाव आहे, तर सुपारी घेणाऱ्या सराईत गुन्हेगाराचं नाव योगेश अडसूळ असं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलीसच पोलिसाच्या जीवावर का उठला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस स्टेशन अमलदार नितीन दुधाळ आणि दत्तवाडी पोलिस स्टेशनमध्ये दिनेश दोरगे हे दोघे कार्यरत आहेत. त्या दोघांमध्ये अनेक वर्षांपासून मैत्री होती. मात्र, मध्यतरी दोघांमध्ये काही वैयक्तिक कारणावरून वाद होण्यास सुरुवात झाली. हे वाद सतत सुरू राहिल्याने नितीन दुधाळ याने सराईत गुन्हेगार योगेश अडसूळ याला दिनेश दोरगे यांना जीवे मारण्याची सुपारी दिली.

जीवे मारण्यासाठी पाठलाग केल्यानं प्रकार उघड

सराईत गुन्हेगार योगेश अडसूळने सुपारी मिळाल्यानंतर जीवे मारण्यासाठी पोलीस कर्मचारी दिनेश दोरगे यांचा अनेक वेळा पाठलाग केला. हा प्रकार दिनेश दोरगे यांच्या लक्षात आल्यानंतर आरोपी योगेश अडसूळला ताब्यात घेण्यात आले. यानंतर चौकशीत आरोपीने फरासखाना पोलिस स्टेशन येथे अमलदार म्हणून कार्यरत असणाऱ्या नितीन दुधाळ याने दिनेश दोरगे यांना जीवे मारण्याची सुपारी दिल्याचे सांगितले.

हेही वाचा : पिंपरी चिंचवडमध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय जोरात, २० दिवसांमध्ये ३८ महिलांची सुटका, १७ जणांना बेड्या

सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर आरोपी सराईत गुन्हेगार आणि आरोपी पोलीस अमलदार नितीन दुधाळ या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची माहिती आरोपी नितीन दुधाळ याला होताच तो फरार झाला आहे. त्या आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांनी दिली.

More Stories onपोलीसPolice
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One police give contract to kill another police in pune know why pbs
First published on: 01-01-2022 at 19:32 IST