अवघ्या पाच दिवसात ऑनलाइन फसवणुकीचे २४१ प्रकार
पुणे : विविध प्रकारची आमिषे दाखवून सामान्यांना गंडा घालण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम असून नव्या वर्षांत पुणे पोलिसांसमोर सायबर गुन्हे तसेच आर्थिक फसवणुकीचे गुन्हे रोखण्याचे आव्हान ठाकले आहे. वर्षांच्या सुरुवातीला पहिल्या आठवडय़ात सायबर पोलीस ठाण्यात ऑनलाइन फसवणुकीचे २४१ तक्रार अर्ज दाखल झाले आहेत.
शहरात घडलेले गुन्हे, गुन्ह्य़ांची आकडेवारी याबाबतचा लेखाजोखा पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम यांनी नुकताच मांडला. खून, सोनसाखळी हिसकावणे, जबरी चोरी, घरफोडी अशा गुन्ह्य़ांना अटकाव घालण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी नवीन वर्षांत पोलिसांसमोर सायबर गुन्हे तसेच आर्थिक फसवणुकीचे गुन्हे रोखण्याचे आव्हान आहे. पोलीस आयुक्त डॉ. वेंकटेशम यांनी याबाबत सूतोवाच केले आहे.
पारंपरिक गुन्हेगारीचा आलेख कमी होत असताना ‘व्हाईट कॉलर’ गुन्हेगारी वाढत आहे. शहरात गेल्या वर्षभरापासून समाजमाध्यमावरुन झालेल्या ओळखीतून परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष, गुंतवणुकीचे आमिष, लॉटरी लागल्याचे आमिष, संकेतस्थळावरुन मोबाईल संच, फर्निचर, दुचाकी, मोटारी अशा वस्तूंची विक्री करायची आहे, असे आमिष दाखवून सामान्यांना हातोहात गंडा घातला जाण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे.
२०१८ मध्ये सायबर गुन्हे शाखेक डे साडेपाच हजार तक्रार अर्ज दाखल झाले होते. २०१९ मध्ये ८ हजार ६७७ तक्रार अर्ज दाखल झाले होते. तक्रार अर्जाची आकडेवारी पाहता सायबर गुन्ह्य़ांची टक्केवारी वाढली असून आर्थिक फसवणुकीचे गुन्हे वाढीस लागले आहेत.
जनजागृती मोहीम, सामान्यांचा काणाडोळा
पोलीस, बँका तसेच अन्य संस्थांकडून सायबर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांकडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली.महाविद्यालये आणि विविध संस्थांमध्ये तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. अनोळखी व्यक्तींकडून दाखविण्यात येणाऱ्या आमिषांना बळी पडू नका. ऑनलाइन व्यवहार करताना खातरजमा करा, असे आवाहन करण्यात आले. मात्र, पोलिसांकडून करण्यात आलेल्या आवाहनाकडे सामान्यांकडून काणाडोळा करण्यात येत आहे.