एकीकडे पाठय़पुस्तकांच्या किमती दरवेळी वाढत असताना, पहिली ते आठवीच्या पाठय़पुस्तकांची जुन्या पुस्तकांच्या बाजारातील उलाढाल मात्र थंडावली आहे. शासनाकडून मोफत देण्यात येणारी पुस्तके आणि जुन्या पुस्तकांची ऑनलाइन विक्री यांचा तडाखा जुन्या पुस्तकांच्या विक्रेत्यांना बसला आहे.

नव्या पाठय़पुस्तकांबरोबरच जुन्या किंवा वापरलेल्या पुस्तकांची उलाढालही शाळा सुरू होण्यापूर्वी मोठय़ा तेजीत होत असे. नवी पुस्तके घेण्यासाठी दुकानांबरोबरच जुनी पुस्तके विक्रेत्यांकडेही पालकांची गर्दा असे. पुस्तकांची स्थिती, ती किती जुनी आहेत त्या आधारे त्याची किंमत ठरत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून जुन्या पाठय़पुस्तकांची उलाढाल जवळपास बंदच झाली आहे. पहिली ते आठवीच्या बहुतेक विद्यार्थ्यांना शासनाकडून पुस्तके मोफत देण्यात येतात. त्याचप्रमाणे काही शाळाच विद्यार्थ्यांकडून जुनी पुस्तके परत घेऊन ती गरजू विद्यार्थ्यांना देतात किंवा शाळेत ठेवली जातात. त्यामुळे विक्रेत्यांकडे जुनी पुस्तके फारशी येत नाहीत. जुन्या पुस्तकांच्या ऑनलाइन बाजारपेठेचा तडाखा पुस्तकांच्या प्रती विकणाऱ्यांना बसला आहे. शालेय पाठय़पुस्तकेच नाही तर व्यावसायिक अभ्यासक्रमांची पुस्तके, नोट्स यांच्याही विक्रीवर ऑनलाइन बाजाराने परिणाम केला आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी असणाऱ्या अनेक नव्या पुस्तकांवरही संकेतस्थळांवर मोठय़ा सवलती असतात. त्यामुळे मुलांचा ओढा ऑनलाइन पुस्तक खरेदीकडे अधिक आहे, अशी माहिती पुण्यातील अप्पा बळवंत चौकातील जुन्या पुस्तकांचे विक्रेते विजय मरळ यांनी सागितले.

सीबीएसईच्या पुस्तकांची मागणी वाढली

राज्यात विनाअनुदानित शाळांचे प्रमाणही मोठे आहे. मात्र आता विनाअनुदानित शाळा केंद्रीय शिक्षण मंडळाशी (सीबीएसई) संलग्न करण्याकडे संस्थाचालकांचा कल वाढतो आहे. सध्या जुन्या पाठय़पुस्तकांच्या बाजारपेठेत सीबीएसईच्या पुस्तकांची मागणी वाढते आहे. सीबीएसईसाठी शाळांकडून संदर्भ पुस्तकेही दिली जातात. त्या पुस्तकांसाठीही मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सातवीच्या पाठय़पुस्तकांची किंमत वाढली

यंदा सातवीची पाठय़पुस्तके बदलली आहेत. मात्र बदललेल्या पाठय़पुस्तकांबरोबरच त्यांची किंमतही वाढली आहे. गेल्या वर्षी पर्यंत सातवीच्या मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र या पुस्तकांच्या संचाची किंमत साधारण १६५ रुपये होती. यंदा सातवीच्या पुस्तकांच्या संचाची किंमत २९५ रुपये झाली आहे. पुस्तकांचा आकार मात्र मोठा झाला आहे आणि संपूर्ण पुस्तकाची छपाई रंगीत आहे.