पिंपरी: महापालिकेच्या सर्व शाळा स्मार्ट, डिजिटल होत असताना क्रीडा विभागाकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. महापालिकेच्या १०५ शाळांमध्ये केवळ आठच क्रीडा शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्यही उपलब्ध नाही.
विद्यार्थ्यांचा विकास हा शाळेतच घडत असतो. शारीरिक, मानसिकदृष्ट्या सदृढ राहण्यासाठी मैदानी खेळ खेळणे आवश्यक असते. मात्र, महापालिकेच्या २२ शाळांना मैदान नाही. १७ शाळांची मैदाने छोटी असून अपुरी पडत आहेत. महापालिकेच्या शाळांमधील मैदानावर खो-खोचे खांब, डबलबारसह क्रीडा साहित्यही दिसत नाही. शाळांनी मैदानावर खो-खो, कबड्डी, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, व्हॉलिबॉल या खेळांसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा… सहकारी बँकांच्या समस्यांवर आजपासून होणार विचारमंथन
महापालिका शाळेत असलेल्या क्रीडा शिक्षकांना इतर कामे दिली जातात. क्रीडा शिक्षक कमी असताना निवृत्तीनंतर रिक्त शिक्षकाचे पद भरले जात नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या क्रीडा विकासाला खीळ बसली आहे. विभागाकडील १५ क्रीडा शिक्षक २०१० पासून निवडणुकीविषयक कामे करत आहेत. त्यांची मूळ पदावर नेमणूक करण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी मागणी केली आहे. मात्र, निवडणूक विभागाने त्यांना अद्यापही त्या कामातून मुक्त केले नाही. या शिक्षकांऐवजी पर्यायी शिक्षक मिळावेत, अशी त्यांची मागणी आहे. ते लवकर मिळतील, अशी अपेक्षा आहे. शाळांना ४९ प्रकारचे क्रीडा साहित्य उपलब्ध करुन देता येईल, असे उपायुक्त मिनिनाथ दंडवते यांनी सांगितले.