‘‘राजकारण्यांवर होणाऱ्या सततच्या आरोपांमुळे त्यांची जनमानसातील प्रतिमा डागाळली आहे. मात्र, युवकांनी व्हिजन डोळ्यासमोर ठेवून राजकारणात सक्रिय झाल्यास नक्कीच सकारात्मक बदल घडेल. किंबहुना हा बदल घडवणे ही युवकांची जबाबदारी आहे,’ असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पाचव्या भारतीय छात्र संसदेच्या उद्घाटन समारंभात गडकरी बोलत होते. या वेळी माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्र सिंग, केंद्रीय युवक कल्याण मंत्रालयाचे सचिव राजीव गुप्ता, महापौर दत्ता धनकवडे, उद्योजक नानिक रूपानी, डॉ. अभय फिरोदिया, खासदार रेणुका चौधरी, किरण खेर, एमआयटी संस्थेचे अध्यक्ष डॉ.विश्वनाथ कराड, उपाध्यक्ष प्रा.राहुल कराड, कार्यकारी संचालक डॉ. मंगेश कराड आदी उपस्थित होते. या वेळी खासदार रेणुका चौधरी यांना ‘गार्गी’ व किरण खेर यांना ‘मत्रेयी’ पुरस्कार देण्यात आला.
या वेळी गडकरी म्हणाले, ‘‘राजकारण्यांमध्ये असलेली सत्तेची लालसा, घमेंड यामुळे लोकांमध्ये वाईट भावना निर्माण झाली आहे. यासाठी समाजाला दोष देता येणार नाही. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती बदलण्याची जबाबदारी युवकांची आहे. सक्षम नेतृत्वाचा प्रश्न सर्वासमोरच आहे. प्रत्येकजण परिपूर्ण नसतो. मात्र, सगळ्याच पक्षांत चांगले लोकही आहेतच. नवे तंत्रज्ञान आत्मसात करून विकासाभिमुख दृष्टिकोन ठेवला, तर राजकीय प्रगल्भता येईल. जातीयवाद ही समाजापुढील गंभीर समस्या आहे, जातीभेद, धमभ्रेद दूर झाले पाहिजेत, अशा चर्चा होतात. मात्र, दुर्दैवाने निवडणुकांत त्याचाच वापर केला जातो.’’
  राजेंद्र सिंग म्हणाले,‘‘एकेकाळी मोफत मिळणाऱ्या पाण्यासाठी आता पसे मोजावे लागत आहेत. देश दुष्काळासारख्या गंभीर समस्येला सामोरा जात आहे. ही परिस्थिती बदलायची असेल, तर पाण्याच्या सुरक्षिततेवर विचार करण्याची गरज आहे. त्याचबरोबर नसíगक साधनांचा योग्य वापर करावा लागेल.’’