राजस्थानातून अफू विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अमली पदार्थ विरोधी पथकाने बिबवेवाडी भागात पकडले. त्याच्याकडून चार लाख ६० हजार रुपयांची २३० ग्रॅम अफू, मोबाइल संच, दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. लाडूराम वागाराम बिष्णोई (वय २०, रा. सरनाऊ, जि. जालोर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
हेही वाचा >>> आयटी कंपनीतील नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र देवून ७० जणांची फसवणूक करणारी टोळी अटकेत
बिष्णोई सध्या कोंढवा भागातील काकडे वस्ती परिसरात राहायला आहे. तो बिबवेवाडीतील सुखसागरनगर परिसरात अफू विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. सापळा लावून पोलिसांच्या पथकाने त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. त्याच्याकडून अफू, मोबाइल संच, दुचाकी असा पाच लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक शैलजा जानकर, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, राहुल जोशी आदींनी ही कारवाई केली.