पुणे: मुंबई, पुण्यासह ‘एमएमआर’ क्षेत्रातील प्रमुख महापालिकांमध्ये यांत्रिक सफाई तसेच रुग्णवाहिकांचा पुरवठा करण्याची शेकडो कोटी रुपयांची कंत्राटे मिळवून प्रकाशझोतात आलेले सुमित ग्रुपचे प्रमुख अमित साळुंखे यांना झारखंड मद्य घोटाळा प्रकरणात तेथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पुण्यातून अटक केल्यानंतर विरोधकांनी आरोपांची राळ उडवली आहे. हजारो कोटींची रुग्णवाहिका निविदा प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणीही विरोधकांनी केली आहे.

यांत्रिक सफाई तसेच स्वच्छतेच्या कामात मुंबई, पुण्यातील ठरावीक कंपन्यांची मक्तेदारी मोडून काढत महापालिकांमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे अमित यांच्या कंपनीला मिळाली. यातून त्यांच्या सत्तावर्तुळातील वाढत्या प्रभावाची चर्चा सुरू होती. अमित साळुंखेंच्या अटकेनंतर खासदार संजय राऊत यांनी त्याचा श्रीकांत शिंदे फाउंडेशनशी संबंध असल्याचा आरोप केल्याने या प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक्स या समाज माध्यम मंचावर पोस्ट करून झारखंड दारू घोटाळ्यातील आरोपी पुण्यातील आहे असे म्हटले. ‘सुमित फॅसिलिटी कंपनीला राज्यात १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका चालविण्याचे कंत्राट कोणाच्या काळात दिले गेले,’ असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

‘सुमीत फॅसिलिटीजच्या संचालकांना झारखंड पोलिसांनी अटक केली आहे. राज्यातील ६००० कोटी रुपयांच्या रुग्णवाहिका घोट्याळाचा ते एक भाग आहेत, असा आरोप आम्ही वर्षभर करतो आहोत. आम्ही प्रश्न उपस्थित करूनही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. आम्ही आणखी पुरावा आणू, पण सध्या निविदेला स्थगिती देणे आवश्यक आहे,’ असे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) आमदार रोहित पवार यांनी म्हटले असल्याचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे.

झारखंड लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकाऱ्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तपास अहवालात (रिमांड रिपोर्ट) दिलेल्या माहितीनुसार, ४५० कोटी रुपयांच्या मद्य घोटाळ्यात वरिष्ठ शासकीय अधिकारी, तसेच तेथील उद्योजकांना अटक करण्यात आली आहे. सुमीत फॅसिलिटीजचे संचालक अमित प्रभाकर साळुंखे (वय ३५, रा. सुदर्शनगर, पिंपळे गुरव) मद्य घोटाळ्यात सामील असल्याची माहिती चौकशीत मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमित साळुंखेंचा प्रवास

सुमित ग्रुपच्या माहिती पत्रकातील माहितीनुसार, अमित साळुंखे याच्याकडे कंपनीचे मुख्याधिकारी आणि संचालक म्हणून जबाबदारी आहे. स्पेनमधील मॉन्ड्रॅगन युनिव्हर्सिटीमधून व्यवस्थापनशास्त्रातील पदवीचे शिक्षण घेतले. २०१६ मध्ये कंपनीत व्यावसायिक कारकीर्द सुरू केली. अनेक राज्यांतील सरकारे अथवा स्थानिक स्वराज संस्थांशी या समूहाची भागीदारी आहे. प्रामुख्याने स्वच्छता आणि रुग्णवाहिका सेवा समूहाकडून दिली जाते. अडीच ते तीन वर्षांत नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली यांसारख्या महापालिकांमध्ये या कंपनीने मिळवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या कामामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.