निवडणुकीचे काम जाणीवपूर्वक टाळल्यामुळे विद्यापीठातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, असे आदेश पर्वती मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी विद्यापीठाला दिले असून यामध्ये विलंब झाल्यास कुलसचिवांवरच कारवाई करण्याची तंबी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्हा प्रशासनाने पुणे विद्यापीठातील २५ कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. या कर्मचाऱ्यांना १ एप्रिल ते २८ मे या कालावधीमध्ये घरोघरी जाऊन छायाचित्रे गोळा करण्याचे आणि मतदारांबाबत पंचनामे करण्याचे काम देण्यात आले होते. या कामामध्ये टाळाटाळ करणाऱ्या विद्यापीठातील तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि कारवाईचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवावा, असे आदेश मतदान नोंदणी अधिकाऱ्यांनी विद्यापीठाला दिले आहेत. याबाबत कुलसचिवांना पत्र पाठवण्यात आले आहे. आदेशाच्या अंमलबजावणीमध्ये विलंब झाल्यास कुलसचिवांवरच कारवाई करण्याची तंबी देण्यात आली आहे. निवडणुकीच्या कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विद्यापीठाने ‘कारणे दाखवा’ नोटीस दिली आहे.