पिंपरी : पावसाळा संपूनही शहराच्या विविध भागांत तीनशेहून अधिक खड्डे असल्याचे निदर्शनास आले असतानाच आता महापालिकेच्या स्थापत्य विभागाने स्वयंचलित वाहनांमार्फत रस्त्यांवरील खड्ड्यांचे सर्वेक्षण हाती घेतले आहे. हे सर्वेक्षण महिनाभरात पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर खड्डे बुजविण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना शहर खड्डेमुक्त हाेण्यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे २०७३ किलाेमीटर अंतराचे रस्ते आहेत. त्यांपैकी जुन्या १२०० किलाेमीटर रस्त्यांचे दाेन स्वयंचलित वाहनांमार्फत सर्वेक्षण हाती घेतले आहे. या वाहनांवर सहा कॅमेरे असून ‘सेन्सर’ही असणार आहे. सर्वेक्षणाचे काम पेव टेक संस्थेला प्रतिकिलाेमीटर दरानुसार दिले आहे. शहरातील रस्त्यांवर दर वर्षी पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतरही माेठ्या प्रमाणात खड्डे पडतात. यंदाच्या पावसाळ्यात शहराच्या विविध भागांत ६२४६ खड्डे पडले हाेते. त्यांपैकी ५९४० खड्डे बुजविण्यात आले असून ३०६ खड्डे अद्याप बुजविण्यात आलेले नाहीत. रस्त्यावरील खड्डे आणि त्यामुळे चालकांना हाेणारा त्रास याचा विचार करून महापालिकेने स्वयंचलित वाहनांमार्फत सर्वेक्षणाचे काम हाती घेतले आहे. ही वाहने शहरातील सर्वच रस्त्यांवरून फिरणार आहेत. सर्वेक्षणात रस्त्याच्या स्थितीचे मूल्यांकन, खड्डे असलेला परिसर ओळखण्यासाठी आणि आवश्यक दुरुस्तीला प्राधान्य देण्यात येणार आहे.

हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ मालमत्ता होणार जप्त

इंडियन रोड काँग्रेसच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार संरचनात्मक मूल्यांकन केले जाणार आहे. रस्त्यांबाबत संकलित केलेली माहिती महापालिका भौगोलिक माहिती प्रणालीवर (जीआयएस) अद्ययावत केली जाणार आहे. त्याआधारे खड्डेदुरुस्तीवर लक्ष ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. यामुळे एकाच ठिकाणी सतत पडणारे खड्डे टाळणे, रस्त्यांची गुणवत्ता सुधारण्यास मदत होईल, असा दावा महापालिकेने केला आहे.

हेही वाचा…….तर प्राध्यापक भरती आणखी सहा महिने लांबणीवर?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रस्ते सर्वेक्षण आणि देखभाल उपक्रम हा सुरक्षित रस्ते प्रदान करण्याचा महत्त्वाचा टप्पा आहे. स्वयंचलित तंत्रज्ञान आणि ‘जीआयएस’ प्रणालीच्या आधारे रस्त्यांच्या समस्या तत्काळ सोडविण्यास मदत होणार आहे. अर्थसंकल्पातील नियोजन आणि रस्तेबांधणीच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासही मदत मिळू शकणार आहे. सर्वेक्षणात प्रत्येक रस्त्यावरील दहा मीटर अंतराचे छायाचित्र काढण्यात येणार आहे. त्यात खड्डा, पदपथ तुटल्याचे दिसणार आहे. त्यानंतर खड्डे महापालिका बुजवणार असल्याचे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.