सिंहगड पायथ्याच्या डोणजे फाटा येथे भाताच्या लागवडीतून काळ्या बिबटय़ाचे (ब्लॅक पँथर) चित्र साकारण्यात आले आहे. जपानमध्ये ‘पॅडी आर्ट’ नावाने प्रचलित असलेली ही कला वनस्पतितज्ज्ञ श्रीकांत इंगळहळ्ळीकर यांनी साकारली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंगळहळ्ळीकर हे उद्योजक आणि वनस्पती तज्ज्ञ आहेत. इंटरनेटवर ‘पॅडी आर्ट’ बद्दल माहिती मिळाल्यावर त्यांनी ही कला गेल्यावर्षीपासून पुण्यात साकारण्यास सुरूवात केली आहे. गेल्यावर्षी साकरण्यात आलेला गणपती पुणेकरांसाठी आकर्षण ठरला होता. आता यंदा भात शेतीच्या या चित्रात काळा बिबटय़ा दिसणार आहे. या शेतीचित्राचा आकार १२० बाय ८०  फूट एवढा आहे.

पॅडी आर्टसाठी जमिनीचा कॅन्व्हासप्रमाणे वापर करण्यात येतो. विविध रंग मिळतील अशा वाणांची भाताची रोपे लावून हे चित्र साकारण्यात येते. शेत उभे राहिले की चित्र अधिक स्पष्ट होत जाते. उंचावरून हे चित्र अधिकच स्पष्ट दिसते. गेल्या काही दिवसांपासून हे शेतीचित्र पुणे आणि परिसरातील पर्यटकांसाठी आकर्षण ठरले आहे. साधारणपणे डिसेंबर महिन्यापर्यंत हे शेतीचित्र पाहता येईल.

पॅडी आर्टचा जन्म

दक्षिण जपानमधील ओमोरी जिल्ह्य़ात असलेले इनाकादाते या गावात ‘पॅडी आर्ट’चा जन्म झाला. या भागात वर्षांनुवर्षे भातशेती केली जाते. ही भातशेती कोणत्याही यंत्राच्या वापराविना केली जाते.  या भातशेतीला १९९३मध्ये दोन हजार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने तेथील शेतकऱ्यांनी उत्सव साजरा करण्याचे ठरवले आणि त्यातून ‘पॅडी आर्ट’ किंवा ‘टॅम्बो अटा’ ही जपानमध्ये प्रसिद्ध झाली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Paddy art in rice cultivation black panther pictures
First published on: 21-09-2017 at 04:00 IST