दुष्काळामुळे उजनी धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात लुप्त झालेली इंदापूर तालुक्यातील अनेक गावे आणि प्राचीन मंदिरे पुन्हा एकदा खुली झाली आहेत.
धरणातील पाणी कमी झाल्यामुळे पळसदेव येथील पळसनाथाचे चालुक्यकालीन मंदिर खुले झाले आहे. गेल्या ३५ वर्षांपासून ते पाण्याखाली होते. मात्र आजही ते दिमाखात उभे असलेले पाहायला मिळत आहे. दगडात बांधलेल्या या मंदिरासाठी अत्यंत रेखीव अशी कलाकुसर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची बांधणी असलेली मोजकीच मंदिरे आहेत. चुना आणि विटांच्या बांधकामातील वैशिष्टय़पूर्ण पद्धतीचे शिखर, सभामंडप, अंतराळ कक्ष, कोरीव खांबांवर तोलून धरलेले छत अशी या मंदिराची रचना आहे. गृहाच्या दरवाजावर पंचशाखा आहेत. अभ्यासकांच्या मते पुष्प शाखा, नर शाखा, स्तंभ शाखा, लता शाखा आणि व्याल शाखा या पंचशाखा आहेत. मंदिरात देवनागरी लिपीतील एक शिलालेखही आढळला असून आवारात अनेक वीरगळ आहेत. इतिहासाचे आणि मंदिरांचे अभ्यासक सध्या या मंदिरास भेट देऊन त्याचा अभ्यास करत आहेत.
यापूर्वी सन २००३ च्या दुष्काळात हे मंदिर खुले झाले होते. त्या वेळी ‘लोकसत्ता’ने त्यास ठळक प्रसिद्धी दिली होती. त्या वेळी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची देखल घेत केंद्रीय पुरातत्त्व खात्याच्या पथकाने अभ्यासासाठी पळसदेव मंदिरास व परिसराला भेट दिली होती. मंदिराचे योग्य पद्धतीने जतन व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
पळसदेव गावाला सुमारे सातशे ते आठशे वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. पळसदेव हे गाव नवहंस राज्याची राजधानी होते. संपूर्ण गावास तटबंदी आणि चार वेशी होत्या. रामाजी काळे आणि गोमाजी काळे या भावांचा समृद्ध इतिहास या गावाला आहे. पळसदेव गाव सन १९७६-७७ च्या सुमारास उजनी पाणलोट क्षेत्रात संपादित करण्यात आले. नवीन गावात शासनाने दिलेल्या नुकसान भरपाईतून नवे मंदिर बांधण्यात आले असून त्यात जुन्या मंदिरातील महादेवाची पिंड आणि नंदी स्थापन करण्यात आला आहे. या मंदिराचे महत्त्व लक्षात घेऊन गावातील पन्नास तरुणांनी एकत्र येत सुमारे दोन लाख रुपये खर्चून येथे काही चांगली विकासाची कामे नुकतीच केली आहेत.