आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त ज्येष्ठ कथ्थक नृत्यगुरु शमा भाटे, मनीषा साठे आणि पं. नंदकिशोर कपोते यांना पं. बिरजू महाराज नृत्याचार्य पुरस्काराने शुक्रवारी सन्मानित करण्यात आले. पायलवृंद संस्था आणि कोहिनूर ग्रुप यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, पायलवृंदच्या संचालिका निकिता मोघे आणि सुनील महाजन या वेळी उपस्थित होते.
तळवलकर म्हणाले, भारतात गुरू शिष्य परंपरेला दीर्घ इतिहास आहे. शास्त्र समजावून सांगितले जाते, विद्या दिली जाते पण कला ही संस्कारीतच केली जाते. गुरू एखादी गोष्ट गिरवून घेतो, ठसवून सांगतो त्यावेळेस प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संस्करणाची ही प्रक्रिया घडत असते. पं. बिरजू महाराज यांच्याकडून संस्कारित झालेली नृत्य परंपरा या कलाकारांनी पुढे नेली आहे.
भाटे म्हणाल्या की, परमेश्वराने एकच बिरजू महाराज घडविले. कलाकारांचे कलाकार आणि नर्तकांचे नर्तक असेच त्यांचे वर्णन करता येईल. साठे म्हणाल्या की, थेट शिष्या नसतानाही नृत्य परंपरेत मी पं. बिरजू महाराज यांना आदर्श मानले आहे. कपोते म्हणाले की, कथ्थक परंपरेचा उत्तम वारसा लाभलेला असताना पं. बिरजू महाराज यांनी आपली स्वतःची शैली विकसीत केली होती. प्रत्येक घराण्यातील चांगले टिपण्याची त्यांची भूमिका होती.