समता प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा सत्यशोधक दिनकरराव जवळकर पुरस्कार ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा यांना जाहीर झाला आहे. सिंहगड रस्त्यावरील बॅ. नाथ पै सभागृहात २८ एप्रिल रोजी ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष मधुकर निरफराके यांनी दिली.
१० हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समता प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी शाहू-फुले-आंबेडकर विचारधारा पुढे नेणाऱ्या मान्यवरांस हा पुरस्कार दिला जातो. या आधी डॉ. बाबा आढाव, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. आ.ह. साळुंखे, गेल ऑमव्हेट, डॉ. जनार्दन वाघमारे, प्रा. शिवाजीराव खैरे, प्रा. विलास वाघ, प्रा. एन.डी. पाटील, उत्तम कांबळे आदी मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.