पिंपरी : बहुतांश महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या घटत असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. २०२२-२३ मध्ये ४८ हजार असलेली पटसंख्या यंदा ५४ हजारांवर पोहोचली आहे. नावीन्यपूर्ण उपक्रम, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार शिक्षणामुळे महापालिका शाळांवर पालकांचा विश्वास वाढल्याचा दावा शिक्षण विभागाने केला.

महापालिकेच्या १३४ शाळांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ४८ हजार १५३ इतकी असलेली प्रवेशसंख्या वर्ष २०२३-२४ मध्ये ५० हजार ५८१, तर शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये ५० हजार ७४९ वर पोहोचली आहे. चालू शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये आठ सप्टेंबरपर्यंतच ही संख्या ५४ हजार ४१८ इतकी झाली आहे. यामध्ये मुलींचे प्रमाण सातत्याने वाढत असून ते शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये २४ हजार ७८८ वरून वर्ष २०२३-२४ मध्ये २५ हजार ९०२ आणि शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये २५ हजार ९२२ इतके झाले आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये केवळ प्रवेशसंख्याच वाढत नाही, तर मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये देखील चांगली वाढ दिसून येत आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या मूल्यमापनानुसार प्रारंभीच्या पातळीवरील विद्यार्थ्यांचे प्रमाण शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील २८ टक्क्यांवरून वर्ष २०२४-२५ मध्ये १३ टक्क्यांवर आले, तर उच्च पातळीवर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ०.५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यामध्ये प्राथमिक वर्गांच्या निकालांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली. इयत्ता दुसरीतील प्रारंभी पातळीवरील विद्यार्थी ३० टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंत कमी झाले आहेत, तर प्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण ० टक्क्यांवरून थेट २५ टक्क्यांवर गेले असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले.

शाळांमध्ये विविध उपक्रम

महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये ‘स्पंदन’, ‘द आर्ट बॉक्स’ प्रदर्शन, ‘जल्लोष शिक्षणाचा’, ‘भारत दर्शन’ हे उपक्रम राबविले जातात. पोलीस विभागाच्या ‘पोलीस काका’ व ‘दामिनी पथका’च्या सहकार्याने तसेच मुस्कान फाउंडेशन व अर्पण यांच्या माध्यमातून शाळांमध्ये बालसंरक्षण प्रशिक्षण दिले जात आहे. शाळांमध्ये सध्या २३ समुपदेशक कार्यरत असून शाळा व्यवस्थापन समित्या सुरक्षा व बालसंरक्षण उपाययोजनांवर काटेकोरपणे लक्ष दिले जाते.

शालेय साहित्याच्या थेट लाभ हस्तांतरण, डिजिटल वर्गखोल्या, वाचनालयांपासून कला शिक्षकांपर्यंत विविध सुधारणा शाळांमध्ये केल्या आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत. पालकांनाही महापालिकेच्या शाळांतील दर्जेदार शैक्षणिक सुविधांची माहिती दिली जात असून त्यामुळे प्रवेशसंख्येत वाढ होत आहे, असे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले.

पालक आत्मविश्वासाने शाळेची निवड करत आहेत. पीएम श्री योजनेमुळे आम्हाला खासगी शाळांसारख्या सुविधा मिळाल्या आहेत. रोबोटिक्स व इनोव्हेशन प्रयोगशाळेचाही समावेश आहे. ‘सक्षम’ उपक्रमामुळे विद्यार्थी अधिक सुसज्ज झाले आहेत, असे म्हेत्रे वस्ती पीएमश्री महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिका स्नेहल मोरे यांनी सांगितले.

अनेक पालक त्यांच्या मुलांना खासगी शाळेतून महापालिका शाळांमध्ये प्रवेश घेत आहेत. यावरून महापालिका शाळांमधील शिक्षणाच्या गुणवत्तेवर पालकांचा विश्वास दिसून येतो, असे कासारवाडीतील छत्रपती शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक परिजात प्रकाश यांनी सांगितले.