पुणे : शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाच्या नूतन वास्तुचे उद्घाटन साडेपाच वर्षांपूर्वी झाले. उद्घाटनानंतर कौटुंबिक न्यायलयातील वाहनतळ खुला करुन न दिल्याने कौटुंबिक न्यायालयातील वकिलांसह पक्षकारांची मोठी गैरसोय होत असून वाहने लावण्यासाठी वकिलांसह पक्षकारांना जागेच्या शोधात वणवण करावी लागत आहे.

कौटुंबिक न्यायालयातील वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. गणेश कवडे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. शिवाजीनगर न्यायालयाला जोडणारा भुयारी मार्ग अद्याप सुरू करण्यात आला नसून भुयारी मार्ग सुरू करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. याबाबत मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती आणि कौटुंबिक न्यायालयाच्या पालक न्यायाधीश भारती डोंगरे, उच्च न्यायालयाचे प्रबंधक आणि कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीशांना निवेदन देण्यात आले आहे. शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयाची इमारत आदर्शवत असून १२ ऑगस्ट २०१७ रोजी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रमुख न्यायमूर्ती डाॅ. मंजुळा चेल्लूर यांच्या हस्ते कौटुंबिक न्यायालयाच्या नूतन वास्तुचे उद्घाटन करण्यात आले होते. तेव्हापासून कौटुंबिक न्यायालयाच्या आवारातील वाहनतळ बंद आहे. वाहनतळ खुला करुन देण्यासाठी वेळोवेळी वकिलांकडून मागणीही करण्यात आली होती.

हेही वाचा >>> लांबलेल्या परीक्षा, विस्कळीत शैक्षणिक वर्षावरून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत गदारोळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उच्च न्यायालयाने सशुल्क वाहनतळ सुरू करण्यास परवानगी दिली होती. वकिलांनी त्याला विरोध केला होता. कौटुंबिक न्यायालयातील वकिलांना शिवाजीनगर न्यायालयाच्या आवारात वाहन लावावे लागते. वाहन लावण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने गैरसोय होत आहे. शिवाजीनगर न्यायालय आणि कौटुंबिक न्यायालयाला जोडणारा भुयारी मार्ग बंद आहे. भुयारी मार्ग तसेच कौटुंबिक न्यायालयातील वाहनतळ ३१ मार्चपर्यंत सुरू न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा कौटुंबिक न्यायालयातील वकील संघटनेचे माजी अध्यक्ष ॲड. गणेश कवडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.