कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला

पिंपरी : राज्याचे लक्ष वेधून घेतलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे श्रीरंग बारणे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे पार्थ पवार यांनी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी, मंगळवारी विश्रांती घेतानाच सोमवारी झालेल्या मतदानाची सविस्तर माहिती कार्यकर्त्यांकडून घेतली. कार्यकर्त्यांचे तसेच मतदारांचे त्यांनी आवर्जून आभार मानले.

शरद पवार यांची निवडणूक रिंगणातून माघार आणि पार्थ पवार यांच्या उमेदवारीची एकाच वेळी नाटय़मयरीत्या घोषणा झाल्यापासून मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक हा चर्चेचा विषय ठरला. त्याआधीपासूनच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा मावळ लढवणार असल्याचे संकेत गेल्या दिवाळीपासून मिळत होते. तेव्हापासून ते सोमवारी मतदानप्रक्रिया पार पडेपर्यंत मावळविषयीची असणारी उत्सुकता कायम आहे. सोमवारी सायंकाळी सहा वाजता मतदान संपले. त्यानंतर, पवार तसेच बारणे समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. त्याला कारणही तसेच होते.

गेल्या दोन महिन्यांपासून प्रचारात असलेले कार्यकर्ते कमालीचे थकले होते. उमेदवारांनाही ताणतणाव, मानसिक दडपण होतेच. त्यामुळे मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी या उमेदवारांच्या डोक्यावरचा ताण कमी झाल्याचे दिसून येत होते.

श्रीरंग बारणे यांनी सकाळी प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर, सोमवारी झालेल्या विधानसभानिहाय मतदानाची माहिती घेण्यास सुरुवात केली. पक्षासाठी राबलेल्या कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले. मतदारांचे आभार मानणारे पत्र समाजमाध्यमावर टाकण्याची सूचना त्यांनी केली. पार्थ पवार यांची सोमवारी रात्री उशिरापर्यंत फोनाफोनी सुरू होती. मंगळवारी सकाळी त्यांनी प्रमुख नेत्यांना दूरध्वनी करून मतदानाची माहिती घेतली. तसेच, कार्यकर्त्यांचे आभारही मानले. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा लढवणाऱ्या उमेदवारांची बैठक मुंबईला बोलावली होती, त्यासाठी पार्थ रवाना झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.