पुणे : केंद्रीय संस्थांतील अभियांत्रिकी-तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी यंदा लागू करण्यात आलेली बारावीला ७५ टक्के अनिवार्यतेच्या अटीमध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या निर्णयानुसार (एनटीए) सर्व मंडळांच्या बारावीच्या परीक्षेत पहिल्या २० पर्सेंटाइलमधील विद्यार्थी त्यांच्या जेईई मुख्यतील गुणांसह प्रवेशासाठी पात्र ठरू शकणार आहेत. 

एनटीएने करोना काळात केंद्रीय संस्थांतील प्रवेश पात्रतेमध्ये बदल करून बारावीला ७५ टक्के गुणांच्या अनिवार्यतेची अट स्थगित केली होती. यंदा परिस्थिती पूर्वपदावर आल्याने केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी बारावीला ७५ टक्के गुणांची अट पुन्हा लागू करण्याचा निर्णय एनटीएने घेतला. या निर्णयावर विद्यार्थी-पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. एनटीएसह केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे ही अट शिथिल करण्याची मागणी करण्यात आली. तसेच, न्यायालयात याचिकाही दाखल झाली. या पार्श्वभूमीवर एनटीएने घेतलेल्या निर्णयाची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

हेही वाचा – पुणे : मैत्रिणीवर चाकू हल्ला करणाऱ्या तरुणाला जन्मठेप, सात वर्षांपूर्वीची घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एनआयटी, आयआयआयटी आणि केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी जेईई मुख्यच्या गुणांसह बारावीला किमान ७५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे किंवा संबंधित परीक्षा मंडळाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांचे गुण पहिल्या २० पर्सेंटाइलमध्ये असणे आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी बारावीला ६५ टक्के गुण अनिवार्य आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.