पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्राधान्य मेट्रो मार्गिकेवरील प्रत्यक्ष प्रवासी सेवा सुरू होणार असतानाच प्रवाशांच्या सुविधेसाठी विविध उपाययोजना महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून सुरू करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत ये-जा करण्यासाठी सायकल सेवेबरोबर विजेवर धावणाऱ्या दुचाकी आणि तीन चाकी वाहन सेवा महामेट्रोकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मेट्रो मार्गिकेअंतर्गत पिंपरी महापालिका ते फुगेवाडी अशी मेट्रोची प्रत्यक्ष सेवा येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. त्यादृष्टीने प्रवाशांना मेट्रो स्थानकापर्यंत सहज आणि किफायतशीर पर्यायाने पोहोचता यावे, या पूरक वाहन सेवांचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते मंगळवारी झाले.

सायकल सेवेसाठी महामेट्रोने माय बाईक या संस्थेबरोबर पहिल्या टप्प्यात करार केला आहे. सर्व सायकलींना जीपीएस प्रणाली असून तासिका, दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक अशा तत्त्वावर सायकली उपलब्ध होणार आहेत. लास्ट माइल कनेक्टिव्हिटी या उपक्रमाअंतर्गत पूरक वाहन सेवा देण्याची सुरुवात या उपक्रमाअंतर्गत करण्यात आली आहे.

पुण्यातील वनाज ते गरवारे महाविद्यालय हा पाच किलोमीटर तर पिंपरी महापालिका ते फुगेवाडी या सात किलोमीटर अंतरावर प्रवासी सेवा फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. पुण्यातील प्राधान्य मार्गामध्ये पाच स्थानके आहेत. वनाज, आनंदनगर, आयडीयल कॉलनी, एसएनडीटी महाविद्यालय आणि गरवारे महाविद्यालय या स्थानकात या सायकली ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी महामेट्रोकडून पार्किंग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर पिंपरी, संत तुकारामनगर, भोसरी, कासारवाडी आणि फुगेवाडी ही पिंपरी-चिंचवड येथील स्थानके आहेत.

नोकरीसाठी कार्यालयात जाणारे नागरिक काही ठरावीक वेळेतच दुचाकीचा वापर करता, ही बाब लक्षात घेऊन किफायतशीर दरात सेवा देण्यात येणार आहे.

यामुळे पर्यावरण संतुलन राखण्याबरोबरच इंधन खर्चातही बचत होणार असून सायकल वापरालाही प्रोत्साहन मिळणार आहे. सायकलचा वापर झाल्यानंतर कोणत्याही मेट्रो स्थानकावर सायकल पार्किंग करता येणार आहे. येत्या काही दिवसांत नव्याने काही कंपन्यांबरोबर करार करण्यात येणार असून सायकलींची संख्याही वाढविण्यात येणार आहे. या पूरक सेवेमुळे प्रवास सुखकर होईल, असा दावा महामेट्रोकडून करण्यात आला आहे.

एकूण ३२ किलोमीटर लांबीची मार्गिका

पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील एकूण ३२ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिकेचे काम पहिल्या टप्प्यात सुरू आहे. यातील पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट ही मेट्रो मार्गिका कृषी महाविद्यालयापर्यंत उन्नत स्वरूपाची असून पुढे स्वारगेटपर्यत भुयारी आहे. भुयारी मेट्रोसाठी बोगदा निर्मितीचे कामही वेगाने सुरू असून एकूण बारा किलोमीटर लांबीपैकी १० किलोमीटर लांबीच्या बोगदा निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. प्रवासी सेवा सुरू होणाऱ्या मेट्रोचा पहिल्या एका किलोमीटरसाठी दहा रुपये असा तिकीट दर असून दिल्लीच्या धर्तीवर तिकीट रचना करण्यात आली आहे.

अंतिम तांत्रिक तपासणीनंतर प्रवासी सेवा

प्रवासी सेवा सुरू होणाऱ्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानकांची कामे पूर्ण झाली आहेत. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरसी)कार्यालयाच्या पथकाकडून पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो मार्गाची तपासणी डिसेंबर महिन्याअखेरी करण्यात आली होती. तर पुण्यातील मार्गिकेची तपासणी येत्या काही दिवसांत होणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील कामाबाबत सीएमआरसीच्या पथकाने समाधान व्यक्त केले असून सेवा सुरू करण्याबाबतची मान्यता महामेट्रोला मिळाल्यातच जमा आहे. पुण्यातील मार्गिकेची तांत्रिक आणि स्थानकातील प्रवासी सुविधांची तपासणी झाल्यानंतर मेट्रोची प्रवासी सेवा सुरू होईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passenger service will started on priority metro line between pune and pimpri chinchwad zws
First published on: 19-01-2022 at 01:06 IST