मोबाइल अॅपला प्रवाशांची चांगली पसंती
बसथांब्यावर बस कधी येईल, जवळचा बसथांबा कोणता, बसचा मार्ग काय आदी प्रश्नांची उत्तरे आतापर्यंत कधीच न मिळालेल्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांना बसचे स्थळ (लोकेशन), आजूबाजूचे मार्ग (रुट्स), बस येण्याची अचूक वेळ अशी माहिती मोबाइल अॅपद्वारे उपलब्ध होत असल्यामुळे प्रवासी आता पीएमपीशी ‘कनेक्ट’ झाले आहेत. ‘पीएमपी ई-कनेक्ट’ च्या माध्यमातून बससेवेची योग्य माहिती मिळत असल्यामुळे या अॅपला चांगला प्रतिसाद असून प्रवाशांकडून अॅपला चांगले रेटिंगही देण्यास सुरुवात झाली आहे.
पीएमपीच्या सेवेत सुधारणेबरोबरच पीएमपी प्रवासी केंद्रित व्हावी, यासाठी पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी पीएमपीचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रवाशांच्या सेवेसाठी मोबाइल अॅप करण्यात येईल, असे सांगितले होते. त्यानुसार हे अॅप तयार करण्यात आले. हाताळण्यास सुलभ, पीएमपीच्या गाडय़ांची जाण्या-येण्याची, मार्गाची, बसथांब्यांची अचूक माहिती, तक्रार नोंदविण्याची सुविधा, अॅपच्या माध्यमातून झपाटय़ाने होत असलेले तक्रारींचे निवारण आणि मुख्य म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून केलेल्या उपाययोजना या बाबींमुळे पीएमपी ई-कनेक्ट अल्पावधीतच लोकप्रिय ठरले आहे. शहरातील साडेअकरा हजाराहून अधिक जणांनी हे मोबाइल अॅप डाऊनलोड केले आहे. तर पाचपैकी तब्बल ४.३ असे रेटिंग या अॅपला मिळाले असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.
या मोबाइल अॅपच्या माध्यमातून पीएमपी प्रशासनाकडे विविध प्रकारच्या ४४३ तक्रारी दाखल झाल्या आहेत. चालक-वाहकाचे उद्धट वर्तन, चुकीची तिकिट देणे, जुन्या मार्गामध्ये बदल करणे, नवीन बसमार्ग सुरू करणे, पास केंद्रावरील घोळ, सुट्टय़ा पैशांबाबतची तक्रार, नादुरुस्त बस, गाडी चालविताना मोबाइलवर बोलणारा चालक, रिकामी असतानाही बस न थांबविणे, थांब्यावर बस व्यवस्थितरीत्या न थांबविणे, वाहतुकीचे नियम न पाळणे अशा तक्रारींचा यात समावेश आहे. तक्रार झाल्यानंतर मोबाइल अॅपच्या माध्यमातूनच ती त्या-त्या विभागाकडे तत्काळ जाते.
तक्रार निवारणासाठी चोवीस तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार या सर्व तक्रारींचे निवारणही प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तक्रारीचे निवारण झाल्यानंतर पीएमपीच्या कामकाजाबाबत समाधानी आहात का, या पर्यायालाही पसंती मिळाली आहे. त्यामुळे अॅपचे रेटिंगही वाढत आहे.
पीएमपी ई-कनेक्टची वैशिष्टय़े
अॅपवर लॉगइन केल्यानंतर बस ट्रॅकर, प्लॅनर आणि तक्रार करण्याचे पर्याय येतात. बस ट्रॅकरमध्ये बस सध्या कुठे आहे, कुठल्या स्टॉपवर किती वेळेत पोहोचणार आहे, आजूबाजूचे बसथांबे कोणते आहेत याची माहिती मिळते. बसचे वेळापत्रकही यामध्ये आहे. मोबाइल अॅपच्या वेळेप्रमाणे गाडय़ा थांब्यावर येत असल्याचा प्रतिसादही अॅपच्या माध्यमातून शेकडो प्रवाशांनी पीएमपीला दिला आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही यात काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार अॅपच्या माध्यमातून चालक-वाहकाची माहिती, गाडीचा क्रमांक आपण एसएमएस किंवा अन्य मार्गाने पाठवू शकतो. त्यामध्येही गाडी इच्छित थांब्यावर किती वाजता पोहचू शकणार आहे, हे स्पष्ट होते. गाडी थांब्यावर वेळेत न आल्यास अॅपच्या माध्यमातून तक्रारही करण्याची सुविधा आहे.
पीएमपीचे हे अॅप ट्रॅकिंग, लोकेशन, सिक्युरिटी आणि टायमिंग यावर आधारित आहे. अॅपमुळे प्रवाशांच्या वेळेची बचत होत असून येत्या काही दिवसांमध्ये या अॅपमध्ये दुसऱ्या टप्प्यात आणखी काही बदल करण्यात येणार आहेत.
तुकाराम मुंढे, अध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालक, पीएमपी