काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे शहरातील पहिल्या मेट्रो मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले. या मेट्रोला जनतेनेही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, मेट्रो मार्गावर असलेल्या एका स्थानकामुळे प्रवाशांच्या तक्रारी वाढल्या आहेत. ‘भोसरी’ असे या स्थानकाचे नाव सध्या चर्चेचे केंद्र बनले आहे. पुणे मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट यामार्गादरम्यान असलेल्या स्थानकाचे नाव गोंधळात टाकणारे असून ते रहिवासी भागापासून दूर असल्याने लोकांना पायी जावे लागत असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

पिंपरी ते फुगेवाडी हा पाच किमी लांबीचा मार्ग गेल्या आठवड्यात सुरू करण्यात आला. ‘भोसरी स्थानका’मुळे प्रवाशांमध्ये विशेषत: गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत नाशिक फाटा येथे हे स्थानक असताना त्याला ‘भोसरी स्टेशन’ असे नाव देण्यात आले आहे. भोसरी हे पिंपरी-चिंचवड औद्योगिक शहराचे उपनगर असून ते नाशिक फाट्यापासून किमान ५ किलोमीटर अंतरावर आहे.

प्रवाशांच्या अडचणी

इंडियन एक्सप्रेच्या वृत्तानुसार, भोसरी येथील रहिवासी असलेल्या सचिन रंगदळ यांनी गेल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड येथे मेट्रो ट्रेनमध्ये चढलेल्या आपल्या नातेवाइकांना ती भोसरीकडे जात नसल्याचे समजल्यानंतर त्यांना बराच वेळ, पैसा वाया घालवावा लागल्याचे सांगितले. “आमचे नातेवाईक पिंपरी येथे मेट्रो ट्रेनमध्ये चढले. मेट्रो ट्रेन भोसरीला जाते, असे त्यांना सांगण्यात आले. एका स्टेशन नंतर, ते स्टेशनवर उतरले कारण सहप्रवाशांनी त्यांना भोसरी स्टेशन आल्याचे सांगितले,” असे सचिन रंगदळ म्हणाले.

रंगदल म्हणाले की, त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना असे आढळून आले की ते खाली उतरलेल्या स्टेशनचा भोसरीच्या उपनगराशी काहीही संबंध नाही. खरेतर तो नाशिक फाटा परिसर होता. त्यानंतर त्यांना रिक्षाने नाशिक फाटा परिसरातून पाच-सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या भोसरीला जावे लागले. पाच किमीच्या प्रवासासाठी त्यांना १५० रुपये मोजावे लागले. त्याआधी त्यांना मेट्रोच्या तिकिटासाठी हेलपाटे मारावे लागले. मेट्रो स्टेशनच्या या चुकीच्या नामकरणामुळे त्यांचा बराच वेळ वाया गेला.”

पतित पावन संघटनेचे राजेश मोटे म्हणाले कू, “आम्ही भोसरी स्थानकाच्या नामकरणावर तीव्र आक्षेप घेतला असून त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. महामेट्रोने हे नाव बदलावे. तसेच, त्यांनी स्थानकांची नावे देण्याबाबत भविष्यात काळजी घ्यावी.”

इतर मेट्रो स्थानकांच्या जागेवरही कासारवाडीतील रहिवाशांनी आक्षेप घेतला आहे. “नाशिक फाटा स्टेशन हे रहिवासी राहत असलेल्या ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरावर आहे. त्याचप्रमाणे गजबजलेल्या उपनगरापासून कासारवाडी स्थानकही एक किलोमीटरहून अधिक अंतरावर आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी स्टेशनपर्यंत चालत जाऊ शकतात. पण ज्येष्ठ नागरिक आणि आजारी लोकांचे काय? गजबजलेल्या पुणे-मुंबई महामार्गावरून त्यांनी चालावे अशी तुमची अपेक्षा कशी आहे? असा सवाल कासारवाडी सिटिझन्स फोरमचे समन्वयक जयंत कारिया यांना केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत महामेट्रोचे प्रवक्ते हेमंत सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आम्ही भोसरी स्थानकाचे नाव बदलण्याचा विचार करत आहोत. ते लवकरच होईल.