पिंपरी : पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणारे पवना धरण ९९.७० टक्के भरले आहे. त्यामुळे शहरवायीयांच्या वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली आहे. पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातून ४ हजार ३०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पवना नदी दुथडी भरून वाहत असून नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा पवना धरण मुख्य स्त्राेत आहे. पवना नदीत पाणी सोडून महापालिका रावेत येथील बंधाऱ्यातून पाणी उचलते. पाणी निगडी, प्राधिकरणात जल शुध्दीकरण केंद्रात तर आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीत साेडून निघाेजे बंधाऱ्यातून दाेन पंपाव्दारे उचलून चिखली येथील जल शुध्दीकरण केंद्रात आणले जाते. तिथे अशुध्द पाण्यावर प्रक्रिया केल्यानंतर जलवाहिन्यांव्दारे पाणी शहराला वितरित केले जाते. सध्या शहराला पवना ५२०, आंद्रा धरणातून ९०, एमआयडीसीकडून २० असे ६३० एमएलडी (दशलक्ष लीटर) पाणी पुरवठा केला जात आहे.
शहराला गेल्या पावणेसहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. यंदा उन्हाळा कडक होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठी २४ टक्क्यांवर आला हाेता. मात्र, पावसाने मे महिन्याच्या २० तारखेनंतर पिंपरी-चिंचवडसह मावळात पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षानंतर यंदा २४ जूनलाच धरणातील पाणीसाठा ५० टक्के झाला हाेता. त्यानंतरही धरण परिसरात पावसाने जाेरदार हजेरी लावली हाेती. १६ जुलैअखेर धरणात ७७.८० टक्के पाणीसाठा झाला हाेता. त्यामुळे जुलैच्या १२ दिवसांत शहराला चार महिने पुरेल एवढे पाणी म्हणजे धरणातून तब्बल दाेन टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला हाेता. मात्र, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. ऑगस्टमध्ये धरण परिसरात काेसळणा-या श्रावण सरींमुळे धरणातील पाणीसाठा ९५ टक्यांवर गेला. मागील तीन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणीसाठा ९९. ७० टक्क्यांवर गेला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे धरणातून ४ हजार ३०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
एक हजार ९५६ मिमी पावसाची नोंद
पवना धरण दरवर्षी १५ ऑगस्टपूर्वी शंभर टक्के भरत असते. यंदा मात्र जुलै महिन्यात तब्बल दाेन टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे पवना धरण शंभर टक्के भरण्यास १९ ऑगस्ट उजाडले. जून महिन्यांपासून धरण परिसरात एक हजार ९५६ मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे