पिंपरी : पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, धरणातील पाणीसाठा ७७ टक्क्यांवर पोहोचला आहे. या धरणातून पाच जुलैपासून पवना नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, आतापर्यंत दाेन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी सोडण्यात आले आहे. हा पाणीसाठा पिंपरी-चिंचवडकरांना चार महिने पुरेल एवढा हाेता.
या धरणात गेल्या वर्षी १६ जुलैअखेर ३४.११ टक्के इतका पाणीसाठा होता, तर एक हजार ४१५ मिमी पावसाची नाेंद झाली हाेती. यंदा मात्र, धरण परिसरात आतापर्यंत तीन हजार ६३६ मिमी पावसाची नाेंद झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराला प्रामुख्याने मावळातील पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जात आहे. यंदा पावसाला मे महिन्यामध्येच सुरुवात झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली. बुधवारअखेर धरणात ७७.८० टक्के पाणीसाठा झाला आहे. शहराला मागील सहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. मावळातील पवना धरणातून ५२०, आंद्रा धरणातून ९०, तर एमआयडीसीकडून २० असे ६३० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी शहराला देण्यात येते.
पवना धरणातून साेडण्यात येणारे पाणी महापालिका रावेत येथील बंधाऱ्यावरून उचलून प्राधिकरणातील जलशुद्धीकरण केंद्रात, तर आंद्रा धरणातील पाणी इंद्रायणी नदीत साेडून निघोजे बंधाऱ्यातून दाेन पंपांद्वारे उचलून ते चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. तिथे प्रक्रिया करून शुद्ध पाणी शहराला वितरित केले जाते.
पवना धरणाची साडेआठ टीएमसी क्षमता आहे. या धरणातून मावळातील विविध गावांसह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जाताे. शहरासाठी वर्षभराला साडेसहा टीएमसी पाणी राखीव आहे. यंदा उन्हाळ्यात धरणातील पाणीपातळी २५ टक्क्यांवर आली हाेती. मात्र, पावसाला २० मे पासूनच सुरुवात झाली. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढू लागला. जूनमध्येच धरणातील पाणीसाठा ५० टक्क्यांवर गेला.
पावसाने पुन्हा जाेरदार हजेरी लावल्याने धरणातील पाणीसाठा जुलैच्या सुरुवातीला ७१.४८ टक्क्यांवर गेला. त्यामुळे पाऊस वाढल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण हाेऊ नये यासाठी पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मागील बारा दिवसांत दाेन टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. हा पाणीसाठा पिंपरी-चिंचवडकरांना चार महिने पुरेल इतका हाेता.
पवना धरणात बुधवारअखेर ७७.८० टक्के इतका पाणीसाठा आहे. पूर परिस्थिती निर्माण हाेऊ नये, यासाठी धरणातून पावसाचा अंदाज घेऊन पवना नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.- रजनीश बारिया, शाखा अभियंता, पवना धरण.