पिंपरी- चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणारे पवना धरण ७२ टक्के भरले आहे. पवना धरणातून चारशे क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पवना धरणात झपाट्याने पाणीसाठा वाढला आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी केवळ १९ टक्के इतकाच पाणीसाठा उपलब्ध होता. यावर्षी तो ७२ टक्क्यांवर पोहोचला आहे.
यामुळे पिंपरी- चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. सकाळपासून चारशे क्युसेक पाण्याचा विसर्ग इंद्रायणी नदीपात्रात करण्यात आला. पिंपरी-चिंचवडसह मावळ परिसरातील नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाने पुढील काही दिवस असाच जोर कायम ठेवल्यास अगदी काही दिवसांमध्येच पवना धरण ओव्हर फ्लो होईल. पवना धरण क्षेत्रात गेल्या २४ तासात ३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. एक जून पासून आजपर्यंत तब्बल १ हजार ८५ मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. गेल्या २४ तासात २.३७% इतका पवना धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे.