पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीसुधारचा प्रकल्प राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साडेपाच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीचा (एसईआयएए) पर्यावरण ना हरकत दाखला मिळाला आहे. या अंतिम दाखल्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पास गती मिळणार आहे.

महापालिकेच्या वतीने एक हजार ५५६ कोटी रुपये खर्च करून पवना नदीसुधार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यातून पवना नदी वाहते. पवना धरणापासून नदी सुरू होऊन दापोडी येथे मुळा नदीशी तिचा संगम होतो. शहरात किवळे ते दापोडी असे दोन्ही बाजूचे पवना नदीचे पात्र आहे. शहरातील तिचे अंतर २४.४० किलोमीटर आहे. नदीकाठावर सांडपाणी प्रक्रिया केंद्र (एसटीपी) उभारण्याचे नियोजन आहे.

एसटीपीत प्रक्रिया केलेले पाणी पवना नदीत सोडले जाणार आहे. नदीसुधार प्रकल्पासाठी एक हजार ५५६ कोटी रुपये खर्चाचा आराखडा गुजरातच्या एचपीसी डिजाईन ॲण्ड मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेडकडून बनवून घेण्यात आला. हा आराखडा राज्य शासनाच्या राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन समितीकडे डिसेंबर २०१९ ला पाठविण्यात आला होता. त्या समितीने सुचविलेल्या अनेक त्रुटी दूर करून सुधारित आराखडा वेळोवेळी पाठविण्यात आला. अखेर साडेपाच वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर या समितीने महापालिकेला पर्यावरणाचा ना हरकत दाखला दिला आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेला हा प्रकल्प मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रकल्पात नदीचे पाणी स्वच्छ करणे, नदीकाठावर वृक्षारोपण, सुशोभीकरण केले जाणार आहे. दरम्यान, मुळा नदीच्या वाकड बायपास ते सांगवी पुलापर्यंतच्या पहिल्या टप्पाचे काम सुरू झाले आहे. तसेच, इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पासाठी ना हरकत दाखला यापूर्वीच मिळाला आहे.

आपत्कालीन निधीतील ५८० कोटींची मागणी

पवना नदी शहराच्या मध्य भागातून वाहते. शहराला पावसाळ्यात सर्वाधिक फटका पवना नदीच्या पुराचा बसतो. त्यामुळे राज्य शासनाने पूरग्रस्त शहर म्हणून आपत्कालीन निधीतील ५८० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी महापालिकेने शासनाकडे केली आहे. तसेच कर्जरोख्यांद्वारे निधी उभारण्याचे महापालिकेचे नियोजन आहे.

पवना नदीसुधार प्रकल्पास ना हरकत दाखला मिळाला आहे. राज्य, केंद्र शासनाकडून निधी मिळाल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविली जाईल. त्यानंतर काम सुरू करण्यात येणार आहे. नदीकाठाचे संरक्षण, झीज टाळणे, जैवविविधता वाढविणे, पक्ष्यांची घरटी, निवासस्थाने निर्माण करण्यासाठी ठिकाणे, जलचरवाढीसाठी नैसर्गिक नदीचे पुनरुज्जीवन उपयोगी ठरणार आहे. संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, पिंपरी-चिंचवड महापालिका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शहराच्या स्वच्छतेसाठी आणि पर्यावरण संतुलनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पवना नदीसुधारचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरुवात करावी. ‘नदीसुधार’मुळे नदीचे स्वच्छ, सुंदर व जीवनदायिनी रूप पुन्हा दिसणार आहे. संदीप वाघेरे, माजी नगरसेवक