पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे प्रशासकीय कामकाज डिजिटल पद्धतीने सुरू केल्यानंतर आता ५७ सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. या सेवांचा लाभ नागरिकांना घरी बसून थेट ऑनलाइन पद्धतीने घेता येणार आहे. यासाठी नागरिकांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. राज्य शासनाच्या १५० दिवसीय कृती आराखड्यांतर्गत ही सेवा सुरू करण्यात आली आहे.
महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर येऊन नागरिकांना सर्वप्रथम स्वतःचे खाते तयार करावे लागणार आहे. ही प्रक्रिया केवळ एकदाच करावी लागेल. यामध्ये ओटीपीद्वारे नागरिकाचा मोबाइल नंबर तपासून संग्रहित केला जाईल. आपल्या खात्यामध्ये नागरिकांनी लॉग-इन केल्यानंतर संबंधित सुविधेला नागरिक अर्ज करू शकतात. यासाठी लागणारी कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. ऑनलाइन सेवेसाठी नागरिकांना काेणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
ही सेवा नागरी सुविधा केंद्रामार्फत घेत असल्यास नागरिकांना सेवेचे ५० रुपये शुल्क भरणे आवश्यक आहे. शुल्काची रक्कम भरल्यास ती प्राप्त झाल्याबाबत नागरिकांना संदेश देण्याची सुविधा पुरविण्यात आलेली आहे. एखाद्या सशुल्क सेवेचा लाभ घेण्यासाठी अर्जांबरोबर पूर्ण रक्कम भरावी लागणार आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महापालिकेकडून देणारा अंतिम दाखला हा ऑनलाइन पद्धतीने डाउनलोड करून घेण्यास उपलब्ध केला जाणार आहे.
चार महिन्यांत ४२ कोटी १५ लाखांचे उत्पन्न
विविध दाखले, नकाशे, ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी गेल्या आर्थिक वर्षात ७७ हजार ७७३ अर्ज आले होते. या दाखल्यांपोटी १८७ कोटी ५८ लाख रुपयांचे संकलन झाले. तर, चालू आर्थिक वर्षात विविध प्रमाणपत्रांसाठी आत्तापर्यंत २३ हजार ३८३ अर्ज आले होते. त्यातून ४२ कोटी १५ लाख रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाल्याचे नागरी सुविधा विभागाचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.
अशी आहे सुविधा
- महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर येऊन सर्वप्रथम स्वतःचे खाते तयार करावे.
- ही प्रक्रिया केवळ एकदाच करावी लागेल.
- ओटीपीद्वारे नागरिकाचा मोबाइल नंबर तपासून संग्रहित केला जाईल.
- लॉग-इन केल्यानंतर संबंधित सुविधेला नागरिक अर्ज करू शकतात.
- कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करून प्रक्रिया पूर्ण करता येईल.
- ऑनलाइन सेवेसाठी काेणतेही शुल्क नाही. पण, सेवा नागरी सुविधा केंद्रामार्फत घेत असल्यास ५० रुपये शुल्क.
सेवाहमी कायद्यांतर्गत पुरविण्यात येणाऱ्या ५७ सेवा शंभर टक्के ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. नागरिकांना महापालिका मुख्यालय, क्षेत्रीय कार्यालयात प्रत्यक्ष भेट देण्याची आवश्यकता नाही. घरबसल्या सेवांचा लाभ घेता येईल. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका