पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तीन उपायुक्तांच्या विभागामध्ये फेरबदल केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला निवडणूक विभाग उपायुक्त सचिन पवार यांच्याकडे साेपविला आहे. डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याकडे आरोग्य विभागाची जबाबदारी दिली आहे.

आगामी महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच महापालिकेच्या निवडणूक आणि करआकारणी व करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांची आठ दिवसांपूर्वी पदाेन्नतीने नागपूर येथे बदली झाली. त्यांच्याकडील दोन्ही विभागांचा पदभार कोणाकडे दिला नव्हता. शिंदे यांनाही कार्यमुक्त केले नव्हते. परंतु, शिंदे यांनी कार्यमुक्त करण्याची मागणी केली. त्यानुसार सोमवारी शिंदे यांना महापालिका सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले. त्यानंतर आयुक्त हर्डीकर यांनी तीन उपायुक्तांच्या विभागांमध्ये बदल केला.

त्यानुसार उपायुक्त सचिन पवार यांच्याकडून आराेग्य विभागाचा पदभार काढून त्यांच्याकडे निवडणूक आणि जनगणना विभाग साेपविला आहे. नागरी सुविधा केंद्राचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याकडे आराेग्य व स्वच्छ भारत अभियानाचा अतिरिक्त पदभार दिला आहे. क्रीडा विभागाचे उपायुक्त पंकज पाटील यांच्याकडे करआकारणी व करसंकलन विभागाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली आहे.