अन् आयुक्तांचा अचानक पाहणीदौरा
गोरगरीब रूग्णांना सवलतींच्या दरात चांगली वैद्यकीय सेवा देण्याचा लौकिक असणाऱ्या पिंपरी पालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भोंगळ कारभारावरून सुरू असलेली उलटसुलट चर्चा, रूग्णसेवेचा खेळखंडोबा आणि नागरिकांच्या वाढत्या तक्रारींची दखल घेऊन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी अचानक रूग्णालयात भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. तसेच, रूग्ण व त्यांच्या नातेवाइकांशी रूग्णसेवेविषयी चौकशी केली.
सोमवारी दुपारी आयुक्तांनी थेट चव्हाण रूग्णालय गाठले. तातडीक सेवा कक्षापासून त्यांनी पाहणीला सुरूवात केली. रूग्णांशी ते संवाद साधत होते. त्यांच्या नातेवाइकांकडे रूग्णसेवेविषयी विचारणा करत होते. कर्मचाऱ्यांच्या अडचणींविषयी त्यांनी माहिती घेतली. या पाहणी दौऱ्यात काही ठिकाणी फाटलेल्या चादरी तर काही ठिकाणी अस्वच्छता दिसली, त्यावरून त्यांनी संबंधितांना फैलावर घेतले. रूग्णालयाचा कारभार सुधारावा, खासगी रूग्णालयांच्या तुलनेत अधिक चांगली सेवा देता यावी, यादृष्टीने पाहणी केल्याचे सांगत आवश्यक त्या सूचना आयुक्तांनी वैद्यकीय प्रशासनाला दिल्या. वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता तातडीने भरून काढण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज देशमुख, डॉ. किशोर गुजर, डॉ. अनिल मार्केडेय आदी या वेळी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc commissioner sudden visit to yashwantrao chavan memorial hospital
First published on: 31-05-2016 at 06:34 IST