पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाने प्रगणक गटाची मांडणी, स्थळ पाहणी केल्यानंतर गुगल मॅपच्या आधारे आणि प्रत्यक्ष हद्दीची पाहणी करून प्रभागाचे नकाशे तयार केले आहेत. प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले असून आता प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा एक ऑगस्टनंतर राज्याच्या नगर विकास विभागाकडे पाठविण्यात येणार आहे. प्रभाग रचना जुनीच असून यामध्ये केवळ आरक्षणांचा बदल हाेण्याची शक्यता आहे.
महापालिकेची निवडणूक २०१७ प्रमाणे चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. सन २०११ च्या लोकसंख्येप्रमाणेच प्रभाग रचना केली आहे. एक प्रभाग ४९ हजार ते ५९ हजार मतदारसंख्येचा असणार आहे. शहरात ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवक असणार आहेत. ११ ते १६ जून या कालावधीत प्रगणक गटाची (ब्लॉक) मांडणी करण्यात आली. १९ जून ते ४ जुलै या कालावधीत प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्यात आली. ५ ते १० जुलै या कालावधीत गुगल मॅपच्या आधारे नकाशे तयार करण्यात आले. त्यानंतर ११ ते २४ जुलै या कालावधीत नकाशावर निश्चित केलेली प्रभाग हद्द जागेवर जाऊन तपासणी केली. प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले असून आता प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार केला जाणार आहे. त्यावर आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीच्या स्वाक्षऱ्या करण्यासाठी ३१ जुलैची मुदत आहे. १ ते ५ ऑगस्ट या कालावधीत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्याच्या नगर विकास विभागाला सादर करण्यात येणार आहे.
अंतिम प्रभाग रचना ऑक्टोबरमध्ये
निवडणूक आयाेगाने प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता दिल्यानंतर महापालिका आयुक्त ही प्रभाग रचना २२ ऑगस्टला प्रसिद्ध करणार आहेत. २२ ते २८ ऑगस्ट या कालावधीत प्रभाग रचनेवर हरकती, सूचना मागविण्यात येणार आहेत. आलेल्या हरकतींवर २९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर दरम्यान सुनावणी हाेणार आहे. ३ ते ६ ऑक्टोबर दरम्यान राज्य निवडणूक आयुक्तांनी अंतिम केलेली प्रभाग रचना महापालिका आयुक्त शेखर सिंह प्रसिद्ध करणार आहेत.
लोकसंख्येएवढेच मतदार
२०११ च्या जनगणनेनुसार शहराची लाेकसंख्या १७ लाख २९ हजार ३५९ आहे. महापालिका निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची मतदारयादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यानुसार शहरात १७ लाख ७५१ मतदार आहेत. त्यामुळे लोकसंख्येएवढीच मतदारसंख्या असणार आहे. मतदारयाद्या राज्य निवडणूक आयोगाकडून मागविण्यात आल्या आहेत. मतदारयाद्या प्राप्त झाल्यानंतर त्या प्रभागनिहाय फोडल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
गुगल मॅपच्या आधारे प्रभागाचे नकाशे तयार केले आहेत. नकाशावर निश्चित केलेली प्रभागाची हद्द जागेवर जाऊन तपासणी पूर्ण केली. प्रभाग रचनेचे काम पूर्ण झाले असून आता प्रारूप प्रभाग रचनेचा मसुदा तयार करण्यात येत आहे. ५ ऑगस्टपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्ताव राज्याच्या नगरविकास विभागाला सादर करण्यात येणार आहे. – अविनाश शिंदे, सहायक आयुक्त, निवडणूक विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका.