निकृष्ट दर्जाची व महागडय़ा दराची श्रवणयंत्रे आणि अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करण्यात येणाऱ्या सोनोग्राफी मशीनच्या खरेदी प्रस्तावात अधिकारी, लोकप्रतिनिधी व पुरवठादार यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप झाला, चौकशीची मागणीही झाली. मात्र, त्यानंतरही वादग्रस्त ठरलेले हे प्रस्ताव बहुमताच्या जोरावर स्थायी समितीने मंजूर केले. या प्रकरणाने बुधवारी वेगळे वळण घेतले. या घोटाळेबाजीच्या निषेधार्थ नगरसेविका सीमा सावळे यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी बुधवारी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना घेराव घातला.
श्रवणयंत्रे आणि सोनोग्राफी मशीनच्या खरेदी प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार असल्याची तक्रार सावळे यांनी पुराव्यानिशी केली होती. सत्ताधारी नेते, पुरवठादार व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला होता. तथापि, त्याकडे दुर्लक्ष करून स्थायी समितीने मंगळवारी याबाबतचे प्रस्ताव मंजूर केले. त्यामुळे संतापलेल्या सावळे यांनी बुधवारी दुपारी डॉ. रॉय यांच्या कार्यालयात जाऊन त्यांना घेराव घातला आणि जाबही विचारला. नगरसेविका आशा शेंडगे, शारदा बाबर यांच्यासह मोठय़ा संख्येने महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी सुरक्षा कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली तर रॉय यांची त्रेधा उडाली. सुरुवातीला डॉ. रॉय उडवाउडवीची उत्तरे देत होते. मात्र, नगरसेविकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने रॉय यांना माघार घ्यावी लागली. श्रवणयंत्रे खरेदीसाठी फेरनिविदा काढण्यात येईल आणि दक्षता समितीचा अहवाल मिळाल्याशिवाय डिजिटल सोनोग्राफीची मशीन खरेदी करण्यात येणार नाही, अशी ग्वाही त्यांनी आंदोलकांना दिली. तथापि, हे आश्वासन लेखी स्वरूपात मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यानंतर, रॉय यांनी लेखी दिले.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2015 रोजी प्रकाशित
पिंपरी पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांना घेराव
श्रवणयंत्रे आणि सोनोग्राफी मशीनच्या खरेदी प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार असल्याची तक्रार सावळे यांनी पुराव्यानिशी केली होती.
First published on: 18-06-2015 at 03:15 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pcmc medical officer fraud