पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ नंतर आता जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. सन २०१७ मध्ये शहराची मतदारसंख्या ११ लाख ९२ हजार ८९ इतकी होती. आता सुमारे पावणेनऊ वर्षांनंतर महापालिका निवडणूक होत असून, या कालावधीत शहराची मतदारसंख्या पाच लाखांनी वाढली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत १७ लाख १३ हजार ८९१ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक सन २०११ च्या जनगणनेनुसार होत आहे. २०११ मध्ये शहराची लोकसंख्या १७ लाख २७ हजार ६९२ इतकी होती. आता लोकसंख्या ३० लाखांच्या पुढे गेल्याचा अंदाज आहे. फेब्रुवारी २०१७ ला झालेल्या महापालिका निवडणुकीत सन २०११ ची लोकसंख्या ग्राह्य धरण्यात आली होती.
आगामी निवडणुकीसाठीही सन २०११ च्या जनगणनेनुसारच्या लोकसंख्येप्रमाणेच प्रभागरचना करण्यात आली आहे. सध्याची शहराची एकूण मतदारसंख्या १७ लाख १३ हजार ८९१ इतकी आहे. गेल्या पावणेनऊ वर्षांत शहरात पाच लाख २१ हजार ८०२ मतदारसंख्या वाढली आहे.
आगामी महापालिका निवडणुकीसाठी एक जुलै २०२५ पर्यंतची मतदारयादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक सहा लाख ७६ हजार ६३८ इतके मतदार आहेत. त्यात तीन लाख ५४ हजार ७६८ पुरुष आणि तीन लाख २१ हजार ८१२ महिला व ५८ तृतीयपंथी मतदार आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात एकूण सहा लाख २४ हजार १५२ मतदार आहेत. त्यात पुरुष तीन लाख ३५ हजार ७५७, महिला दोन लाख ८८ हजार २९४ व तृतीयपंथी १०१ मतदार आहेत.
पिंपरी विधानसभेत तीन लाख ९९ हजार ८११ मतदार आहेत. त्यात दोन लाख सात हजार ७७५ पुरुष, एक लाख ९१ हजार ९९८ महिला आणि ३८ इतर मतदार आहेत. भाेर विधानसभा मतदारसंघात असलेल्या ताथवडे परिसरात १३ हजार २९० मतदार आहेत.
महापालिकेच्या निवडणूक विभागाकडून प्रभागनिहाय मतदारयादी विभागणीचे काम सुरू आहे. नाेव्हेंबरमध्ये प्रभागानुसार आरक्षणांची साेडत हाेणार आहे. एका प्रभागात ४५ ते ५५ हजार इतकी मतदार संख्या असणार आहे.
