पिंपरी : ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्प्रक्रिया करा’ (रीड्यूस-रीयुज-रीसायकल) केंद्र सुरू केली आहेत. आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत उभारण्यात आलेल्या या केंद्रांद्वारे नागरिकांकडून घरात पडून असलेल्या, पण अजूनही वापरण्यायोग्य वस्तू संकलित करून त्या थेट गरजूंपर्यंत पोहोचवल्या जात आहेत.

कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्प्रक्रिया करा या केंद्रांमध्ये संकलित साहित्याचे प्रथम वर्गीकरण केले जाते. त्यातील उपयुक्त वस्तू गरजूंना मोफत उपलब्ध करून दिल्या जातात, तर उर्वरित वस्तू प्रक्रियेद्वारे नव्याने उपयोगात आणल्या जातात. या उपक्रमामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होण्यास मदत होणार आहे. पुनर्प्रक्रिया संस्कृतीमुळे संसाधनांचा अपव्यय थांबेल. गरजूंना आवश्यक साहित्य मिळेल. तसेच नागरिकांमध्ये स्वच्छता व पुनर्वापराची जाणीव निर्माण होऊन पर्यावरणपूरक शहर घडविण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरेल, असा दावा महापालिकेने केला आहे.

कोणत्या वस्तू जमा करू शकतात?

या केंद्रांमध्ये जुनी, पण वापरण्यायोग्य पुस्तके, वह्या, शालेय साहित्य, चांगल्या स्थितीतील कपडे, चादरी, पडदे, मुलांची खेळणी, शैक्षणिक साधने, घरगुती भांडी, फर्निचर, घरगुती वस्तू, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, चपला, इतर उपयुक्त साहित्य, पुनर्वापर करता येणाऱ्या विविध वस्तू या केंद्रांमध्ये नागरिक जमा करू शकतात. घरात वापरात नसलेल्या, पण उपयुक्त असणाऱ्या वस्तू कचऱ्यात फेकून न देता जवळच्या केंद्रामध्ये जमा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.

कुठे आहेत केंद्र?

‘अ’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कापसे उद्यान, आकुर्डी भाजी मंडई, संत तुकाराम महाराज उद्यान, श्रीधरनगर उद्यान

‘ब’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत थेरगाव, रावेत, काळेवाडीतील ज्योतिबा उद्यान

‘क’ क्षेत्रीय कार्यालय परिसरात हेडगेवार क्रीडा संकुल, धावडे वस्ती, मोशीतील संतशिरोमणी सावता महाराज उद्यान

‘ड’ क्षेत्रीय कार्यालयातील लीनिअर गार्डन कोकणे चौक, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, वाकड येथील तानाजी कलाटे उद्यान,

‘ई’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत मोशी चौक, दिघी जकात नाका, भोसरी उड्डाण पूल

‘फ’ क्षेत्रीय कार्यालयात चिखली, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उद्यान, रुपीनगर पोलीस चौकी

‘ग’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत जगताप नगर, पिंपरीगाव, रहाटणी गावठाण

‘ह’ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज गोल मंडई, सीतांगण उद्यान, जुनी सांगवी भाजी मंडई

पुनर्प्रक्रिया केंद्रे ही काळाची गरज आहे. घरातील वापरण्यायोग्य वस्तू कचऱ्यात न टाकता केंद्रावर आणून द्याव्यात. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण कमी होऊन पर्यावरण संवर्धनाला हातभार लागेल. नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा. – विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

केंद्रांच्या माध्यमातून गरजूंना वस्तूंची मदत होत आहे. पुनर्वापर संस्कृती शहरात रुजण्यास आणि शहर शाश्वत आणि पर्यावरणपूरक बनविण्यास ही केंद्रे उपयुक्त ठरतील. – सचिन पवार, उपायुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका