पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील बिबट्या, श्वान, ससे, रानमांजर आणि पक्ष्यांबरोबर मोरांचा वावर असल्याचे आढळून आले आहे. शनिवारी धावपट्टीच्या काही मीटर अंतरावर तीन मोर मुक्त संचार करत असल्याचे एका विमान प्रवाशाला आढळून आले.
पुणे विमानतळ परिसरात गेल्या काही दिवसांपूर्वी बिबट्याचा वावर असल्याचे सीसीटीव्हीत आढळून आल्याने हवाई दल, विमानतळ प्रशासन आणि वन विभागाकडून या बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर विमानतळ परिसरातील भटक्या श्वानांमुळे विमानोड्डाणांना अडथळे झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाकडूनही श्वान पकडण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.
विमानतळ परिसरात शनिवारी सकाळी तीन मोर आढळून आले, असा दावा विमान प्रवासी गौरव चत्तुर यांनी समाजमाध्यमावर केला आहे.बिबट्या, श्वान, पक्षी यांवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून विमान आणि प्रवाशांची सुरक्षितता निश्चित करण्यात येत असताना आता मोरांचा वावर असल्याचा दावा चत्तुर यांनी केला आहे. त्यामुळे विमानतळ प्रशासनाकडून याबाबत माहिती घेण्यात येत आहे.
दरम्यान, पुणे विमानतळ परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे तीन वेळा आढळून आले आहे. ८ एप्रिल रोजी पहिल्यांदा बिबट्या आढळून आला. विमानतळापासून अवघ्या ८०० मीटर अंतरावर बिबट्या असल्याचे ‘सीसीटीव्ही’मध्ये आढळून आले होते. वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी जाळ्या आणि पिंजरे लावले. मात्र, बिबट्या आढळून आला नाही.
मे महिन्यात वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचून एका पिंजऱ्यात भक्ष्य म्हणून कोंबडी ठेवली. मात्र, बिबट्या पिंजऱ्यात येऊन कोंबडी घेऊन अलगद बाहेर पडला. त्यानंतर बिबट्या आढळून आला नसल्याने तो परिसरातून गेला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मात्र, दोन आठवड्यांपूर्वी विमानतळाच्या धावपट्टीजवळ बिबट्या फिरत असल्याचे ‘सीसीटीव्ही’त आढळून आले. वन विभागाने विमानतळ परिसरात जुन्या नैसर्गिक जलवाहिन्या, मैलावाहिन्यांची जागा निश्चित करून त्या बंद केल्या आहेत.
वन विभागाने विमानतळ परिसरात पिंजरे आणि जाळ्या बसविल्या आहेत. बिबट्याची लपून बसण्याची; तसेच खाद्याच्या शोधात विमानतळ परिसरात प्रवेश करत असलेली जागा वन विभागाने शोधली असून, ती जागा प्रतिबंधित करण्यात आली आहे.
पुणे विमानतळाचा परिसर हा हवाई दलाचा आहे. त्यांच्याकडे याबाबत अधिक माहिती असण्याची शक्यता आहे. विमानतळ प्रशासनाला यासंदर्भात माहिती नाही.- संतोष ढोके, संचालक, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ