पुणे : डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला आणि शेवटच्या टप्प्यातही राज्यात पावसाने हजेरी लावल्याने यंदाही पावसाचे बारमाही चक्र पूर्ण झाले आहे. २०२० या वर्षांतही प्रत्येक महिन्यात राज्यात कुठेना कुठे पावसाने हजेरी लावली होती. सध्या उत्तरेकडील राज्यांत थंडीची लाट असल्याने राज्यात नव्या वर्षांच्या स्वागताला हलकी थंडी राहणार असली, तरी तीन दिवसांनंतर तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.    तापमानातील वाढीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलाचे चटके राज्याला बसत आहेत. त्यामुळे बारमाही पावसाचे सावट निर्माण झाल्याचे हवामान अभ्यासकाकडून सांगण्यात येते. गेल्या वर्षी जानेवारीच्या पहिल्याच आठवडय़ात पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर डिसेंबपर्यंत प्रत्येक महिन्याला कुठे ना कुठे पाऊस झालाच. त्याही वर्षांत मराठवाडा, विदर्भात गारपीट, राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतमालाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. यंदाच्या वर्षीही जानेवारीच्या पहिल्याच आठवडय़ात पावसाला सुरुवात झाली. डिसेंबरची सुरुवात आणि आता शेवटही विदर्भ, मराठवाडय़ातील गारपीट आणि पावसाने झाला. यंदा  मे महिन्यात अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने मुंबईसह राज्याच्या किनारपट्टीला मोठा तडाखा दिला. सातत्याने पावसाळी स्थिती निर्माण होत असल्याने त्याचा परिणाम यंदा थंडीवर झाला. हंगामात ठरावीक दिवस वगळता कडाक्याची थंडी नाही. डिसेंबरच्या मध्यावर उत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळे तीन ते चार दिवस थंडीचा कडाका होता. मात्र, तोही नंतर कमी झाला. सध्या उत्तरेकडील काही राज्यांत आणि मध्य प्रदेशमध्ये थंडीची लाट आहे. त्यामुळे तापमानात काही प्रमाणात घट आहे. थंडीची ही लाट आणखी दोन ते तीन दिवस कायम राहणार आहे. त्यामुळे नव्या वर्षांच्या स्वागताला तापमानात किंचित घट राहणार आहे. ही लाट विरल्यानंतर मात्र पुन्हा रात्रीचे किमान तापमान सरासरीच्या तुलनेत वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

कोकणात तापमान सरासरीखाली

कोकण विभागात सध्या रात्रीचे तापमान सरासरीजवळ, तर रत्नागिरी, अलिबाग येथे ते सरासरीच्या खाली आहे. त्यामुळे या भागात गारवा आहे. मध्य महाराष्ट्रातील किमान तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक ११ ते १५ अंशांपर्यंत असले, तरी रात्रीचा गारवा जाणवतो आहे. मराठवाडय़ात ते सरासरीच्या जवळ असल्याने काही प्रमाणात थंडी आहे. विदर्भामध्ये अनेक ठिकाणी किमान तापमानात घट होऊन ते सरासरीखाली गेले आहे.