सारस्वतांचा मेळा असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि देश-विदेशातील चित्रपट अनुभवण्याची संधी देणारा ‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ (पिफ) हे दोन्ही महत्त्वाचे कार्यक्रम जानेवारीत एकाच वेळी होणार आहेत. या दोन्ही सोहळ्यांमुळे रसिकांवर संक्रांत येणार की पर्याय उपलब्ध होणार हे पाहणे कुतूहलाचे ठरणार आहे.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीतर्फे १५ ते १८ जानेवारी या कालावधीत पिंपरी-चिंचवड येथे ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. तर, राज्य सरकारचा अधिकृत चित्रपट महोत्सव असलेला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १५ ते २१ जानेवारी या कालावधीत होत आहे. सांस्कृतिक विश्वातील हे दोन्ही महत्त्वाचे कार्यक्रम एकाच वेळी आल्यामुळे मात्र मराठी रसिकजनांची पंचाईत झाली आहे. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायचे की दोन्ही कार्यक्रमांना समसमान न्याय द्यायचा, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
जागतिक स्तरावरचे चित्रपट पाहण्यासाठी युवा प्रेक्षकवर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित असतो. त्याचप्रमाणे काही वयाने ज्येष्ठ असलेले चित्रपटप्रेमीही महोत्सवाला आवर्जून उपस्थित असतात. नेमक्या त्याच काळात साहित्य संमेलन होत असल्याने प्रेक्षक विभागला जाणार आहे हे निश्चित झाले आहे. साहित्य संमेलन आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव एकाच वेळी होत असले, तरी या दोन्ही कार्यक्रमांना मिळणाऱ्या प्रतिसादात काही फरक पडेल असे वाटत नाही. चित्रपट महोत्सवाच्या तारखा बऱ्याच आधी ठरविल्या जातात, असे पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमांची विपुलता असणे हे उत्तम लक्षण आहे. साहित्य संमेलनासाठी १५ ते १८ जानेवारी या तारखा सोयीच्या ठरत होत्या. त्यामुळे याच काळात संमेलन घेण्याचे निश्चित करण्यात आले असल्याचे साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी सांगितले. दोन मोठे सांस्कृतिक महोत्सव एकाच कालखंडात होत असल्याने दोन्ही ठिकाणी उपस्थित राहू इच्छिणाऱ्यांना मात्र, यापैकी एकच पर्याय स्वीकारावा लागणार आहे.
साहित्य आणि नाटय़संमेलन एकाच वेळी
यापूर्वी २००८ मध्ये सांगली येथील साहित्य संमेलन आणि सोलापूर येथील नाटय़संमेलन हे एकाच वेळी झाले होते. या दोन्ही संमेलनांच्या संयोजकांचा उद्घाटनासाठी राष्ट्रपती याव्यात हा आग्रह असल्यामुळे सकाळी साहित्य संमेलनाचे तर, सायंकाळी नाटय़संमेलनाचे उद्घाटन झाले होते. आता आठ वर्षांनी दोन महत्त्वाचे कार्यक्रम एकाच वेळी येण्याचा योग जुळून आला आहे.