पिंपरी : पायाजवळ वॉर्मर मशीन ठेवल्याने गुडघ्याखालील पाय जळल्याने दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी चिखलीतील एका खासगी रुग्णालयाच्या तीन डॉक्टरांसह दोन परिचारिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयातील समितीच्या अहवालात उपचारात हलगर्जीपणा झाल्याचे निष्पन्न झाल्याने दोषी डॉक्टर, परिचारीकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. हा प्रकार मागीलवर्षी १८ नोव्हेंबर २०२३ रोजी घडला होता.

दिरांश रमाकांत गादेवार (वय २) असे मृत्यूमुखी पडलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. त्याची आई दिपाली गादेवार (वय ३६, रा. नेवाळेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डॉ. जितेश मदनसिंग दोभाळ, डॉ. रजनिश जगदंबाप्रसाद मिश्रा, डॉ. रोहन प्राणहंस माळी, परिचारिका रेचल अनिल दिवे, सविता नंदकिशोर वरवटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपाली यांचा मुलगा दिरांश याला सर्दी झाल्याने त्यास डॉ. दोभाळ यांच्या सल्ल्यानुसार चिखलीतील नेवाळेवस्ती येथील इम्पिरीअल रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना १८ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी सातच्या सुमारास डॉ. मिश्रा, डॉ. रोहन हे दिरांशचा नमुना (सॅम्पल) घेण्यासाठी आले. त्यांनी दिपाली यांना बाहेर थांबण्यास सांगितले. त्यानंतर सकाळी आठच्या सुमारास दिपाली या पुन्हा मुलाजवळ आल्यानंतर त्यांना धक्काच बसला. दिरांशच्या पायाजवळ ठेवलेल्या वार्मर मशीनमुळे त्याचा गुडघ्याखाली पाय पूर्णपणे जळाला. या घटनेत दिरांश याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

हेही वाचा – निवडणूक प्रचारात सहभागी झाल्यास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर कारवाई… काय आहे निर्णय?

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीच्या प्रचाराचा उद्या प्रारंभ; देवेंद्र फडणवीस यांची काळेवाडीत सभा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत दीपाली यांनी तक्रार दिली. यामुळे दिरांशच्या उपचाराची कागदपत्र ससून येथील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीकडे पाठविण्यात आली. नुकताच या समितीचा अहवाल प्राप्त झाला. या अहवालात तीन डॉक्टर व दोन परिचारिका यांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार, चिखली पोलीस ठाण्यात तीन डॉक्टरांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोमारे तपास करीत आहेत.