पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढायची तयारी ठेवावी. त्या दृष्टीने कामकाजाला सुरुवात करण्याचे निर्देश पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांची गुरुवारी मुंबईत बैठक घेतली. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, शहराध्यक्ष योगेश बहल, माजी शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह सर्व माजी नगरसेवक बैठकीला उपस्थित होते.
‘मागील निवडणुकीत नव्याने प्रभागरचना झाली होती. अनेक नगरसेवक भाजपमध्ये गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लाट होती. अतिआत्मविश्वास नडला. त्यामुळे पराभव झाला,’ असे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले. त्यानंतर पवार म्हणाले, ‘सन १९९२ पासून २०१७ पर्यंत महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. शहराचा नियोजनबद्ध विकास केला. प्रशस्त रस्ते, मोठे पूल, मैदाने, क्रीडांगण, शाळा विकसित केल्या. शहरातील वाढत्या लोकसंख्येसाठी पाणी आरक्षित केले. पक्षाने केलेली कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत. प्रभागाचा बारकाईने अभ्यास करावा. मतदारयादीच्या विभागणीकडे लक्ष द्यावे. त्यानुसार प्रभागात कामाला सुरुवात करावी. महापालिका निवडणुकीला पूर्ण ताकदीने सामोरे जायचे आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये मी स्वतः लक्ष घालणार आहे.’
‘राज्यात महायुती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षासह भाजप, शिवसेना (शिंदे) पक्षात इच्छुकांची संख्या जास्त आहे. महायुती झाल्यास अनेकांना निवडणूक लढता येणार नाही. कार्यकर्त्यांना न्याय मिळणार नाही. ऐन वेळी गोंधळ उडाला नको. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढायची तयारी ठेवावी. महायुती होणार आहे, की नाही याबाबत लवकरच कळविले जाईल. प्रभागनिहाय आरक्षण सोडत झाल्यानंतर पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल. महापालिका निवडणूक शेवटच्या टप्प्यात होणार आहे,’ उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.
‘महायुती झाल्यास अनेकांना निवडणूक लढण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी ठेवण्याची सूचना अजित पवार यांनी केली आहे. त्या दृष्टीने तयारी सुरू केली जाणार आहे. शनिवारी कार्यकारिणी जाहीर केली जाणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी सांगितले.
कार्यकारिणीला मान्यता
भोसरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केलेले अजित गव्हाणे यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सात ऑक्टोबर २०२४ रोजी माजी महापौर योगेश बहल यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीला एक वर्षे होऊन गेले, तरी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नव्हती. अजित पवार यांनी गुरुवारच्या बैठकीत कार्यकरिणीला मान्यता दिली आहे. दोन दिवसांत कार्यकारिणी जाहीर केली जाणार आहे.
