पिंपरी : दिवाळीनिमित्त बाजारात पूजा साहित्य, खरेदीसाठी झालेली गर्दी, फुले आणि फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मुख्य बाजारपेठा आणि पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रत्येक भागात मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण झाला होता. महापालिकेने मुख्य बाजारपेठांबरोबरच संपूर्ण शहरातील कचरा उचलला. त्यामध्ये दिवाळीचे सहाही दिवस सरासरी १५०० टन कचरा महापालिकेकडून उचलण्यात आला. दाेनशे टनांनी कचऱ्यात भर पडल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहरातील घरोघरचा कचरा घटांगाडीमार्फत संकलित केला जातो. मोशीतील कचरा डेपो येथे हा कचरा टाकला जातो. शहरात दरराेज ओला आणि सुका असा सरासरी १३०० टन कचरा संकलित केला जातो. मात्र, दिवाळीत कचऱ्यात भर पडते. दिवाळीसाठी मागविलेल्या विविध वस्तूचे बाॅक्स, पुट्टे, फटाक्याचा कचरा वाढला आहे. मुख्य बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रेते पूजेचे साहित्य व विविध साहित्याचे स्टॉल लावत असतात. दिवाळीचा पाडवा संपल्यानंतर स्टॉल हटविण्यात येतात. त्यानंतर संपूर्ण कचरा रस्त्यावरच पडतो. फुले, पूजा-साहित्याचा कचरा यामध्ये सर्वाधिक असतो.
दिवाळीच्या सुरूवातीपासूनच कचरा वाढत गेला. यामध्ये १८ ऑक्टोबरला धनत्रयाेदशीला सर्वाधिक एक हजार ६३७ टन, १९ ऑक्टोबरला एक हजार ५०१ टन, २० ऑक्टोबरला नरक चतुर्दशीला एक हजार ५६० टन, २१ ऑक्टोबरला लक्ष्मीपूजनादिवशी एक हजार ५६७, २२ ऑक्टोबरला पाडव्यादिवशी एक हजार ४१३ टन आणि २३ ऑक्टोबरला एक हजार ४१७ टन कचऱ्याचे संकलन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले. नियमितच्या कचरा संकलनात यंदाच्या दिवाळीत दोनशे टन अतिरिक्त कचऱ्याची भर पडली असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिली. दिवाळीच्या दिवसात शहरात दररोज सरासरी १५०० टन एवढा कचरा जमा झाल्याचा अंदाज महापालिकेकडून वर्तविण्यात आला आहे. इतर दिवशी हा कचरा १३०० टन एवढा असतो.
दिवाळीत कचरा संकलनात वाढ झाली आहे. घरोघरी, बाजारपेठेतील संकलनही वाढले. दिवाळीमध्ये दिवसाला १५०० टन एवढा कचरा जमा झाला. -सचिन पवार, उपायुक्त, आराेग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका
