पिंपरी : रस्त्याने जाताना एका मुलीने खर्चासाठी दहा रुपये मागितले असता माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत असे म्हटल्याने तेथेच थांबलेल्या एकाने तरुणावर चाकूने वार केले. ही घटना गुरूवारी चिंचवड-आकुर्डी लिंक रोडवरील अग्रसेन भवनजवळ घडली.
याप्रकरणी सुजन रमेश मोरे (वय १९, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर जगताप (आकुर्डी) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरे हे बँकेतून पैसे काढून चिंचवड-आकुर्डी लिंक रोडने जात होते. ते अग्रसेन भवनासमोर थांबलेले असताना एका मुलीने त्यांच्याकडे खर्चासाठी दहा रुपये मागितले. त्यावर मोरे यांनी माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीत असे सांगितले. त्यावेळी तेथे थांबलेल्या जगताप याने मोरे यांना शिवीगाळ केली. तसेच मी तुला ठार मारतो असे म्हणते चाकू काढून पोटात व कंबरेला वार करून गंभीर जखमी केले.
म्हाळुंगेत यु-टर्नचा जाब विचारल्याने लोखंडी गजाने मारहाण
अचानक जोरात यु टर्न मारल्याचा जाब विचारल्याने लोखंडी गजाने डोक्यात मारून रिक्षा चालकाला जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना शुक्रवारी खेड तालुक्यातील म्हाळुंगे गावच्या हद्दीत घडली.
याप्रकरणी गणपत दामोदर कदम (वय ५७, म्हाळुंगे) यांनी म्हळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शशांक नरेंद्रकुमार शुक्ला (वय २२, म्हाळुंगे) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदम हे आपल्या रिक्षातून हुंडाई चौकातून एचपी चौकाकडे जात होते. त्यावेळी पिकअप मोटार घेऊन जात असलेल्या आरोपीने हुंडाई चौक येथे अचानक जोरात यु टर्न मारला. त्याचा कदम यांनी आरोपीला जाब विचारला. त्यावर शुक्लाने सुरूवातीला हसून टाळाटाळ केली. नंतर शिवीगाळ केली. त्यामुळे कदम यांनी शुक्लाच्या कानाखाली मारली. त्यानंतर शुक्लाने मोटारीतील लोखंडी गज काढून कदम यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारून गंभीर जखमी केले.
मालकाच्या खुर्चीवर बसला म्हणून नोकरावर कैचीने वार
कंपनीला सुट्टी असलेल्या दिवशी नोकर कंपनी मालकाच्या खुर्चीवर बसला. त्याचा राग येऊन कंपनी मालकाच्या भावाने नोकराच्या मानेवर कैचीने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना गुरूवारी तळवडे येथे घडली.
याप्रकरणी निरज हुशार सिंग (वय १८, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजू नामदेव सोनटक्के (वय ३४, रा. मोरेवस्ती, चिखली) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निरज हा तळवडे येथील एका कंपनीत काम करतो. गुरूवारी कंपनीला सुट्टी होती. तो कंपनी मालकाच्या खुर्चीवर बसून मोबाईल पाहत होते. त्यावेळी कंपनीच्या मालकाचा भाऊ राजू तेथे आला. निरज हा मालकाच्या खुर्चीवर बसल्याचा राजूला राग आला. त्याचा जाब विचारत राजूने निरजला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यामुळे निरज कंपनीच्या बाहेर पळून जात असताना राजूने तुला जिवंत सोडत नाही असे म्हणून मानेवर कैचीने वार केले.
बावधनमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर वार
पूर्ववैमनस्यातून पाच अल्पवयीन मुलांनी मिळून आपल्याच मित्रावर धारदार शस्त्राने वार केले. ही घटना गुरुवारी बावधन येथे घडली. याप्रकरणी अर्थव अविनाश ढोणे (वय १८, रा. भुंडेवस्ती, ता. मुळशी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पाच अल्पवयीन आरोपींपैकी चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे मित्र आहेत. सर्वजण गुरूवारी पार्टी करण्यासाठी एकत्र आले होते. आरोपींचे फिर्यादी यांच्यासोबत एक महिन्यापूर्वी किरकोळ भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरून आरोपींनी फिर्यादी यांच्या डोक्यावर, पाठीवर व दोन्ही हातावर लोखंडी धारदार शस्त्राने वार केले.