दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये अवघ्या ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. लक्ष्मण देवासी नावाच्या या चिमुकल्याचा मृतदेह त्याच्या घरापासून अवघ्या काही फर्लांग अंतरावर आढळून आला होता. या प्रकारामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली होती. अखेर या प्रकरणाचा तपास लागला असून तब्बल ८३ सीसीटीव्हींचं फूटेज तपासल्यानंतर पोलिसांनी लक्ष्मणचा निर्घृण खून करणाख्या बपील अहमद रईस लष्करला बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकं काय घडलं त्या दिवशी?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मण देवासी हा आठ वर्षीय मुलगा रविवारी दुपारपासून बेपत्ता झाला. त्याचा आई वडिलांनी शोध घेतला, पण तो सापडला नाही. अखेर चिखली पोलीस ठाणे गाठून रात्री सातच्या सुमारास तो बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. पोलीस आणि कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. तेव्हा, त्याच्या घरापासून शंभर मीटर अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत लक्ष्मणचा मृतदेह आढळला. त्याचा अज्ञात व्यक्तीने सिमेंटचा गट्टू घालून खून केला असल्याची माहिती समोर आली.

हा प्रकार समोर आल्यानंतर लक्ष्मणच्या मारेकऱ्याचा शोध सुरू झाला. पोलिसांनी आसपासच्या परिसरातले तब्बल ८३ सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. यातून खरा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. हा आरोपी लक्ष्मण राहात असलेल्या परिसरातच राहात असल्याचं देखील स्पष्ट झालं आहे.

का केली चिमुकल्याची हत्या?

अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बपील अहमद आणि मुलगा लक्ष्मण हे दोघे एकाच इमारतीत राहात होते. बपील अहमदने मुलाशी ओळख वाढवली. रविवारी, त्याचं अपहरण करून घेऊन जात असताना मुलगा रस्त्यात पडला. त्याच्या पायाला जखम झाली. लक्ष्मण आरडाओरडा करत होता. यामुळं बपील अहमदने पडक्या पत्राशेडमध्ये नेऊन मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. बपील अहमदला पैशांची गरज होती. त्यामुळं लक्ष्मणचं अपहरण करून तो त्या बदल्यात एक लाखांची खंडणी मागणार होता असं पोलीस तपासात पुढे आलं आहे.