पिंपरी : आईच्या प्रेमसंबंधावरून चिडलेल्या मुलांनी प्रियकरावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना दापोडी परिसरात घडली. याप्रकरणी जखमी झालेल्या २९ वर्षीय प्रियकराने दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे अल्पवयीन मुलांच्या आईसोबत प्रेमसंबंध आहेत. त्या कारणावरून मुलांनी कोयत्याने फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये फिर्यादीच्या डोक्यावर, हाताच्या पंज्यावर, पायावर आणि पाठीवर वार झाले आहेत. दापोडी पोलीस तपास करत आहेत.
ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धक्काबुक्की
विशेष ग्रामसभा सुरु असताना ठराव मांडण्यासाठी ग्रामपंचायत अधिकाऱ्याने नकार दिला. या कारणावरून एका व्यक्तीने ग्रामपंचायत अधिकाऱ्याला धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची घटना भूगाव ग्रामपंचायत कार्यालयात घडली. ग्रामपंचायत अधिकाऱ्याने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत भूगाव ग्रामपंचायत कार्यालयात बुधवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत आरोपीने दक्षता समिती स्थापन करण्याचा ठराव मांडला. त्यावर ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी विशेष ग्रामसभेत असा ठराव मांडता येत नसल्याचे कारण सांगितले. या कारणावरून आरोपीने अधिकाऱ्याला शिवीगाळ करत दमदाटी केली, त्यांच्या शर्टची कॉलर पकडून धक्काबुक्की केली आणि सरकारी कामात अडथळा आणला. बावधन पोलीस तपास करत आहेत.
फसवणुकीप्रकरणी महिलेवर गुन्हा दाखल
ऑनलाइन आणि रोख स्वरूपात पैसे घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ३५ वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादीचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून १३ वेळा ऑनलाइन आणि रोख स्वरूपात एकूण चार लाख ७६ हजार ८६ रुपये घेतले. आरोपी महिलेने त्या पैशाचा अपहार केला आणि फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.
भरधाव दुचाकीची पीएमपीएमएल बसला धडक, तरुणाचा मृत्यू भोसरीहून कोकणे चौकाकडे जाणाऱ्या बीआरटी मार्गिकेजवळ दुचाकी चालवणाऱ्या एका तरुणाचा अपघात झाला. दुचाकीने रस्ता दुभाजक आणि बसला पाठीमागून धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत होऊन तरुणाचा मृत्यू झाला. मयुर आनंद रसाळ (२८, पिंपळे गुरव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पीएमपीएमएल बस चालक तानाजी किसन तेलंगे (३८, भोसरी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकी घसरुन रस्ता दुभाजक आणि बसच्या मागील भागाला धडकली. यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला. या अपघातात दोन्ही वाहनांचेही नुकसान झाले. सांगवी पोलीस तपास करत आहेत.
गांजा विक्री प्रकरणी तरुणीला अटक
भोसरी येथील बालाजीनगर झोपडपट्टी परिसरात एका महिलेला गांजा विक्री प्रकरणी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने बुधवारी केली. पोलिसांनी बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी येथे राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला अटक केली आहे. पोलीस शिपाई विजय दौंडकर यांनी याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपी तरुणीसह तिच्या नणंदेवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालाजीनगर झोपडपट्टी येथे एक तरुणी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून तरुणीला ताब्यात घेतले. तिच्याकडून ६४ हजार ९४० रुपये किमतीचा १.९४ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तिच्याकडे असलेल्या गांजाबाबत चौकशी केली असता तिने तो गांजा तिच्या नानांदेकडून आणला असल्याचे सांगितले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.