पिंपरी- चिंचवड : भाजप चे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ पडली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज त्यासंदर्भात घोषणा केली. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिंचवड विधानसभा मतदारसंघातून शत्रुघ्न काटे इच्छुक होते. पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. पक्षश्रेष्ठीने शत्रुघ्न काटे यांची समजूत काढून शहर कार्यकारी अध्यक्ष पद सोपवले होते.
दरम्यान, अध्यक्षपदाच्या शर्यतीत नामदेव ढाके यांच्यासह अनेक जण इच्छुक होते. परंतु, पक्षश्रेष्ठीने शत्रुघ्न काटे यांना शब्द दिल्याने अखेर त्यांना भाजप शहराध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. भाजप चे माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांची पिंपरी- चिंचवड शहराध्यक्षपदी निवड झाली आहे. महानगर पालिकेत तीन वेळेस काटे हे नगरसेवक म्हणून निवडून गेलेले आहेत. शत्रुघ्न काटे हे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक मानले जातात. परंतु, याच काटे यांनी चिंचवड विधानसभेच्या काळात आमदार शंकर जगताप यांच्या निवडणुकीच्या वाटेवर ‘काटे’ टाकण्याचा प्रयत्न केला.
माजी आणि नाराज नगरसेवकांची मोट बांधून त्यांनी शंकर जगताप यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. बंड करण्याचा इशारा दिला होता. स्वतः शत्रुघ्न काटे हे चिंचवड विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक होते. या प्रकरणानंतर पक्षश्रेष्ठीने शत्रुघ्न काटे यांची समजूत काढली होती. अखेर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीने हे प्रकरण शांत करण्यात आलं होतं. काटे यांना शहराध्यक्ष पद देण्यात येईल असा शब्द देण्यात आला होता. अखेर तो शब्द भाजप पक्षश्रेष्ठीने पाळल्याचे पाहायला मिळत आहे.