पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक गणेश मंडळांनी पोलिसांच्या आवाहनकडे दुर्लक्ष करत विसर्जन मिरवणुकीत प्रकाशझोतांचा (लेझर बीम) आणि डीजेचा भरपूर वापर केला. ध्वनिवर्धकांच्या दणदणाटामुळे विसर्जन मिरवणूक पाहण्यास आलेल्या भाविकांना त्रास झाला. ढोल, ताशांच्या आवाजाचीही मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले.
चिंचवड आणि पिंपरीतील विसर्जन घाटांवर गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. चिंचवडमधील चापेकर चौकात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांच्या हस्ते गणेश मंडळांचे स्वागत करण्यात येत आहे. मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
रात्री आठच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात झाली. मुख्य मंडळांनंतर आलेल्या काही मंडळांनी ध्वनिवर्धकांचा दणदणाट केला. ढोल-ताशा पथकांचा आवाजही जास्त होता. काही मंडळांनी प्रकाशझोतांचा वापर केला. याचा मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या भाविकांना त्रास झाला. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ग्रामीण भागातही ध्वनिवर्धकांचा दणदणाट दिसून आला. ध्वनिवर्धक, प्रकाशझोत वापरू नये, असे आवाहन पोलिसांनी केले होते. मात्र, त्याकडे बहुतांश मंडळांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.