पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील २५ हजार रुपयांपेक्षा जास्त मालमत्ताकराची थकबाकी असलेल्या मालमत्ताधारकांवर कठोर कारवाईचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. बिगरनिवासी मालमत्ताधारकांची वाहने, मालमत्ता जप्त करणे, नळजोड खंडित करण्याची कारवाई करण्याचा इशारा करआकारणी व संकलन विभागाने दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात सात लाख २६ हजार निवासी, बिगरनिवासी, व्यावसायिक आणि औद्योगिक मालमत्ता आहेत. त्यांपैकी चार लाख ६१ हजार ५०३ मालमत्ताधारकांनी चालू वर्षातील मालमत्ताकराचा भरणा केला आहे. १८ विभागीय कार्यालयांमार्फत कर वसूल केला जातो. एक एप्रिल ते २२ सप्टेंबर दरम्यान ५९५ कोटी २४ लाख रुपयांचा मालमत्ताकर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. ऑनलाइन माध्यमातून कराचा भरणा करून तीन लाख ८० हजार ९४९ मालमत्ताधारकांनी सामान्य करातील सवलतींचा लाभ घेतला आहे.

चालू वर्षासाठी मालमत्ता कर ऑनलाइन पद्धतीने ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी भरल्यास सामान्य करावर थेट चार टक्के सवलत दिली जात आहे. हा लाभ घेण्यासाठी आता केवळ सात दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे नागरिकांनी ३० सप्टेंबरपूर्वी कर भरून सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी केले आहे. ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी कर भरला नाही, तर संबंधित मालमत्ताधारकांना प्रत्येक महिन्याला दोन टक्के विलंब दंड भरावा लागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

थकबाकीदारांवर कठोर कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे. वाहने, मालमत्ता जप्त केल्या जाणार आहे. नळजोड खंडित करण्यात येणार आहेत. – प्रदीप जांभळे-पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

कोटमालमत्ता कर हा महापालिकेच्या महसुलाचे प्रमुख साधन आहे. नागरिकांनी वेळेत कर भरल्यास महापालिकेला विकासकामांना गती देता येईल. नागरिकांसाठी आणखी सुविधा निर्माण करता येतील. नागरिकांनी ३० सप्टेंबर २०२५ पूर्वी कर भरून चार टक्क्यांच्या सवलतीचा लाभ घ्यावा. – शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका