पिंपरी : महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस जाहीर झाला आहे. ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि २० हजार रुपये जादा रक्कम एकत्रित दिली जाणार आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. कर्मचाऱ्यांना दसऱ्यापूर्वीच दिवाळी बोनस मिळणार असल्याने दसऱ्यातच दिवाळी होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाने दिवाळी बोनसबाबत २०२० ते २०२५ असे पाच वर्षांचा करारनामा केला आहे. त्यानुसार दर वर्षी दिवाळीपूर्वी महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोनस, सानुग्रह अनुदान दिले जाते. यंदा एक महिना अगोदरच बोनस देण्याची प्रक्रिया राबविली जात आहे. महापालिका आस्थापनेवरील वर्ग एक ते चारमधील सहा हजार ८१९ अधिकारी व कर्मचाऱ्यांना बोनस दिला जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे : विद्यापीठ चौकातील कोंडीतून लवकरच सुटका! उभा राहतोय मेट्रोशी संलग्न दुमजली उड्डाणपूल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मानधनावरील अधिकारी व कर्मचारी, समूह संघटक, तासिका तत्त्वावरील कर्मचाऱ्यांनाही बोनस दिला जाणार आहे. बालवाडी शिक्षकांना जादा २० हजार रुपये व इतर रक्कम दिली जाणार आहे. त्याचबरोबर २०२२-२३ मध्ये निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही बोनस दिला जाणार आहे. महापालिका कर्मचाऱ्यांना ८.३३ टक्के सानुग्रह अनुदान आणि २० हजार रुपये जादा रक्कम देण्याची कार्यवाही करावी. तरतूद अपुरी पडल्यास वर्ग करावी. कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी बोनस मिळेल याची दक्षता घेण्याचा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी दिला आहे.