पिंपरी : गणेश विसर्जन सुरळीत, सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने पार पडावे, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका सज्ज झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसोबतच आरोग्य सुविधा, स्वच्छता व पर्यावरण संवर्धन यासाठी महापालिकेच्या विविध विभागांकडून नियोजन करण्यात आले आहे. पर्यावरण, आरोग्य, वैद्यकीय, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन, स्थापत्य, सुरक्षा असे महापालिकेचे विविध विभाग समन्वयाने काम करणार आहेत.
शहरातील विसर्जन घाटांवर प्रकाशयोजना, पिण्याचे पाणी, वाहनतळ, वैद्यकीय सुविधा, सुरक्षाव्यवस्था आणि वाहतूक नियोजनाची सोय करण्यात आली आहे. मोशी खाण येथे क्रेन, आवश्यक मनुष्यबळ, पथदिवे, रस्त्यांची सुधारणा, दिशादर्शक फलक, सुरक्षारक्षक बंदोबस्त आणि अग्निशमन यंत्रणा तैनात केली आहे. प्रत्येक घाटावर प्रशिक्षित जीवरक्षक पथके, रेस्क्यू बोट, लाईफ जॅकेट्स, लाईफ रिंग्स आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गर्दी व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन दल देखील सज्ज ठेवले आहे. महत्त्वाच्या विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथके व सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, मदतनीस आणि सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. मुबलक औषधसाठा व तत्काळ उपचारासाठी आवश्यक उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत.
६२,४६९ मूर्तींचे संकलन
महापालिकेच्या आठही क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतून ६२ हजार ४६९ मूर्तींचे संकलन झाले. त्यामध्ये पर्यावरणपूरक १४ हजार आठ आणि पीओपीच्या ४८ हजार ४६१ मूर्तींचा समावेश आहे.
विसर्जन घाटांवर जीवरक्षक, वैद्यकीय पथके व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तैनात आहे. पर्यावरणपूरक आणि सुरळीत विसर्जनासाठी महापालिका सज्ज आहे. नागरिकांनी विसर्जन घाटांवर तैनात असणारे रेस्क्यू पथक, सुरक्षा पथकांकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.- शेखर सिंह,आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका