पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत सुरु केलेल्या ‘कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्प्रक्रिया करा’ (रीड्यूस-रीयुज-रीसायकल – आरआरआर) केंद्रांनी यंदाची दिवाळी सामाजिक जबाबदारीची दिवाळी म्हणून उजळवली आहे. ‘जुनी वस्तू, नवा उपयोग’ या संकल्पनेला प्रत्यक्ष स्वरूप देत अनेकांनी यात सहभाग नोंदवला. ३१ टन वापरायोग्य वस्तू जमा झाल्या.

महापालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकूण ३२ प्रभागनिहाय सुरू असलेल्या ‘कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्प्रक्रिया करा’ केंद्रांमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वापरात नसलेल्या पण सुस्थितीत असलेल्या वस्तू मोठ्या प्रमाणात दान केल्या गेल्या आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने नागरिकांना जुने कपडे, खेळणी, भांडी, पुस्तके, इलेक्ट्रॉनिक वस्तू यांसारख्या वस्तू केंद्रात जमा करण्याचे आवाहन केले होते. नागरिकांनीही हे आवाहन स्वीकारत दानात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. या वस्तूंचे वर्गीकरण करून त्या गरजू कुटुंबांना वितरित केल्या जात आहेत, ज्यामुळे त्यांच्या घरातही आनंदाचा दिवा प्रज्वलित झाला आहे.

महापालिकेकडून जनजागृती

या उपक्रमाला अधिक गती देण्यासाठी महापालिकेकडून जनजागृती बरोबरच विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घरोघरी जाऊन विशेष वस्तू संकलन मोहीम राबविण्यात आली होती. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. महापालिकेच्या सर्व ‘कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्प्रक्रिया करा’ केंद्रांवर मिळून ३१ टन पुनर्वापरा योग्य वस्तू जमा झाल्या आहेत. या माध्यमातून ‘पुनर्वापरातून पर्यावरण संवर्धन’ या संकल्पनेला नागरिकांच्या सहकार्याने बळ मिळाले आहे. ‘स्वच्छता, पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धन’ या तिन्ही मूल्यांचा संगम साधणाऱ्या या अभियानात नागरिकांनी अधिकाधिक सहभागी व्हावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

नागरिक उपक्रमात घेत असलेला उत्स्फूर्त सहभाग, हेच या उपक्रमाचे खरे यश आहे. दिवाळीच्या काळात लोकांनी स्वतःचा आनंद इतरांशी वाटून सामाजिक जबाबदारीचे सुंदर उदाहरण निर्माण केले आहे. ‘जुनी वस्तू, नवा उपयोग’ या संकल्पनेतून नागरिकांनी पर्यावरण संवर्धन आणि माणुसकी या दोन्ही मूल्यांची जपणूक केली आहे.- विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका

या केंद्राच्या माध्यमातून दिवाळी साजरी करताना ‘पुनर्वापरातून पर्यावरण संवर्धन’ साध्य झाले. गरजूंच्या घरातही आनंदाचा प्रकाश पसरला आहे. ही केंद्रे वर्षभर सुरू असून अधिकाधिक नागरिकांनी आपल्या घरातील वापरता नसलेल्या परंतु सुस्थितीत असणाऱ्या वस्तू महापालिकेच्या केंद्रात जमा कराव्यात. जेणेकरून गरजूंना त्याची मदत होईल.- डॉ. प्रदीप ठेंगल,उपायुक्त, आरोग्य विभाग, पिंपरी-चिंचवड महापालिका