पिंपरी : मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांवर खड्डे दिसून येत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरासह मुख्य विसर्जन मार्ग, विसर्जन घाट मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी स्थापत्य विभागाला दिला आहे. मिरवणूक, विसर्जन मार्गांवरील धोकादायक सर्व्हिस वायर, केबल शिफ्ट करण्यासह विद्युतविषयक आवश्यक कामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
आगामी गणेशोत्सव व गणेशमूर्ती विसर्जन अनुषंगाने महापालिका, पोलीस प्रशासन, महावितरण आदी विभागांची आढावा बैठक आयुक्त सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. सहपोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे, विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, शहर अभियंता मकरंद निकम, सहआयुक्त मनोज लोणकर, महावितरणचे कार्यकारी अधिकारी अतुल देवकर या वेळी उपस्थित होते.
मागील आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यांवर मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देश आयुक्तांनी प्रशासनाला दिले. शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग, विसर्जन घाट, तसेच इतर ठिकाणी वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा यांसह आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून विसर्जन घाटांवर योग्य नियोजन करावे, अशी सूचना आयुक्त सिंह यांनी केली.
‘मंडप परवानगीचे अर्ज निकाली काढा’
क्षेत्रीय कार्यालयांनी गणेश मंडळांना मंडप परवाने देताना न्यायालयाच्या निर्देशांचे तसेच शासनाच्या आदेशांचे पालन करावे. अनधिकृत मंडप उभारले जाणार नाहीत, याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. मंडप परवानगीसाठी आलेले अर्ज तातडीने निकाली काढण्याची सूचना आयुक्तांनी केली.
घाटांवर वैद्यकीय, जीवरक्षकांसह जलद प्रतिसाद पथके
गणेशमूर्ती विसर्जनाच्या सर्व ठिकाणी सक्षम वैद्यकीय पथकासह सुसज्ज रुग्णवाहिकेची व्यवस्था केली जाणार आहे. विसर्जन घाटांवर आवश्यक तेवढे कृत्रिम विसर्जन हौद, पीओपी उत्सवमूर्ती व शाडू मातीच्या मूर्तीच्या विसर्जनाची वेगळी व्यवस्था, स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सर्व घाटांवर गणेशमूर्ती संकलनाचे व्यवस्थापन, विसर्जन केलेल्या उत्सव मूर्ती घेऊन जाण्यासाठी वाहने, सर्व घाटांवर आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी जीवरक्षकांसह जलद प्रतिसाद पथके तैनात केली जाणार आहेत.
मोकाट जनावरांच्या बंदोबस्तासाठी पथक
गणेशोत्सव कालावधीत संपूर्ण शहरात स्वच्छतेची विशेष मोहीम राबवावी. सेवाभावी संस्था आणि गणेश मंडळांशी समन्वय ठेवावा, विसर्जन तसेच मिरवणूक मार्गावरील धोकादायक, अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करावी. विसर्जनाच्या ठिकाणी मिरवणूक संपेपर्यंत स्वच्छ पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करावी. मिरवणूक मार्गावर आणि शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरे फिरणार नाहीत, यासाठी पथकांची नियुक्ती करून कार्यवाहीच्या सूचनाही आयुक्त सिंह यांनी दिल्या.