पुणे : विविध शासकीय यंत्रणांकडून उपाययोजना सुरू असूनही प्रत्यक्षात हिंजवडी आयटी पार्कमधील स्थिती ‘जैसे थे’ आहे. त्यामुळे या परिसराचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी आयटीयन्सनी केली आहे.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये खराब रस्ते, पावसाळ्यात पाण्याचा निचरा न होणे यांसह अनेक समस्या आहेत. आयटी पार्कची जबाबदारी विविध शासकीय यंत्रणांमध्ये विभागलेली आहे. त्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पिंपरी-चिंचवड महापालिका, स्थानिक ग्रामपंचायती अशा विविध शासकीय यंत्रणांचा समावेश आहे. या यंत्रणांमध्ये योग्य समन्वय नसल्याने आयटी पार्कमधील नागरी समस्या सुटण्याऐवजी त्यात भर पडते आहे. यंदा पावसाळ्यात आयटी पार्कमधील रस्त्यांवर पाणी साचून त्याचे रूपांतर ‘वॉटर पार्क’मध्ये झाले. यानंतर खडबडून जागे झालेल्या यंत्रणांनी उपाययोजना हाती घेतल्या.
शासकीय यंत्रणांकडून उपाययोजना सुरू असल्या, तरी त्यांचा वेग कमी असल्याचे आयटीयन्सचे म्हणणे आहे. आयटी पार्कमध्ये सुमारे पाच लाख आयटी कर्मचारी काम करतात. आयटी पार्कमधील नागरी समस्या सोडविण्यासाठी त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज महाराष्ट्र संघटनेने केली आहे. आयटीयन्सनी यासाठी ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे. आयटीयन्स मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभागी होत असून, त्यांच्या स्वाक्षऱ्यांनंतर मुख्यमंत्र्यांकडे याबाबत मागणी केली जाणार आहे.
सुप्रिया सुळे यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
आयटी पार्क परिसरातील नैसर्गिक जलप्रवाह अडविण्यात आल्याची बाब समोर आली असून, या प्रकरणी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. ‘हिंजवडी राजीव गांधी आयटी पार्क, माण, मारुंजी आदी परिसरामध्ये पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील नैसर्गिक जलप्रवाह अडविले गेल्याने ही स्थिती उद्भवली, असे अभ्यासकांचे मत आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा आणि नैसर्गिक जलप्रवाह अडविले गेले असतील तर त्याबाबत योग्य दिशेने अभ्यास करून योग्य व दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात,’ असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
हिंजवडी आयटी पार्कचा पिंपरी-चिंचवड महापालिकेत समावेश करायला हवा. आम्हाला चांगल्या पायाभूत सुविधा आणि नेतृत्वाची आवश्यकता आहे. आयटीयन्सचा आवाज नेत्यांपर्यंत पोहोचला असून, आता त्यांना आयटी पार्कमधील समस्या समजल्या आहेत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज महाराष्ट्र