पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका आजपासून (१७ सप्टेंबर) ते दोन ऑक्टोबरपर्यंत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविणार आहे. स्वच्छतेला सामाजिक चळवळीचे रूप देणे, नागरिकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करणे आणि शहरी तसेच ग्रामीण भागातील स्वच्छतेत लक्षणीय सुधारणा करणे, हा या अभियानाचा उद्देश असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.
महापालिकेने या अभियानांतर्गत १६ दिवसांच्या कालावधीत विविध नावीन्यपूर्ण, लोकसहभाग वाढवणारे कार्यक्रम आखले आहेत. त्यातून नागरिकांना प्रत्यक्ष कृतीतून सहभागी करून घेण्याचा प्रयत्न आहे. या मोहिमेत मुख्य रस्ते, बाजारपेठा, बसस्थानके, उद्याने व जलाशय परिसराची स्वच्छता, सफाई मित्रांसाठी आरोग्य तपासणी, सुरक्षा साधनांचे वितरण व जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक उत्पादने, वृक्षारोपण उपक्रम, हरित जीवनशैलीवरील कार्यशाळा व प्रदर्शन घेण्यात येईल. प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी पर्यायी उपाययोजनांची माहिती देण्यात येईल.
ओला-सुका कचरा वर्गीकरण, घरगुती कंपोस्टिंग याविषयी प्रात्यक्षिके व माहितीपत्रके आदींबाबत नागरिकांना माहिती दिली जाईल. विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट व नागरिकांच्या सहभागातून फेरीचे आयोजन केले जाणार आहे. घरातील उपयोगी पण वापरात नसणाऱ्या वस्तू ‘कचरा कमी करा, पुनर्वापर करा आणि पुनर्प्रक्रिया करा’ (रीड्यूस-रीयुज-रिसायकल) केंद्रांमध्ये जमा करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. कचऱ्यातून कलाकृती तयार करून ‘कचरा हा संसाधन आहे’ हा संदेश पोहोचविला जाणार आहे. आपले शहर, आपला परिसर स्वच्छ ठेवणे हीच खरी सेवा आहे. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आयोजित उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी केले.
स्वच्छता ही सेवा अभियान हा केवळ उपक्रम नसून, यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभागी होणे आवश्यक आहे. स्वच्छतेतून आरोग्य, पर्यावरण आणि विकासाचा पाया मजबूत होतो. ‘स्वच्छतेचा संकल्प’ घेऊन शहराला स्वच्छतेचा आदर्श निर्माण करण्यासाठी महापालिका राबवत असलेल्या उपक्रमांमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी केले.