पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आता वाहनतळावर ‘पार्किंग’ची पावती फाडण्यासाठी थांबावे लागणार नाही. महापालिकेने सशुल्क पार्किंग (पे अ‍ॅण्ड पार्क) उपक्रमांतर्गत नागरिकांना सुलभ पद्धतीने वाहनतळाची नोंदणी करण्यासाठी ‘व्हॉट्सअ‍ॅप पार्किंग’ डिजिटल सेवा सुरु केली आहे. या व्हॉट्सअ‍ॅप क्रमाकांवरुन वाहनतळाची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या ३० लाखांच्या जवळपास असून वाहनांची संख्या २५ लाख आहे. गेल्या तीन वर्षांत साडेपाच लाख वाहनांची भर पडली आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. महापालिका प्रशासनाने वाहतूक नियंत्रण, इंधन बचत, सार्वजनिक वाहतुकीचा सुयोग्य वापर आणि त्यामुळे होणारे वैयक्तिक फायदे यांसाठी सशुल्क पार्किंग (पे अ‍ॅण्ड पार्क) धोरण नव्याने राबविले आहे. शहरातील दहा ठिकाणी सशुल्क पार्किंगची अंमलबजावणी केली जात आहे.

त्यामध्ये निगडीतील कै. मधुकर पवळे उड्डाणपूल, भक्ती-शक्ती, नाशिक फाटा, एम्पायर इस्टेट उड्डाणपूल, चिंचवडगावातील चापेकर चौक, पिंपळेसौदागर येथील लिनिअर गार्डनच्या शेजारील अर्बन स्ट्रीट येथे, स्पॉट १८ सनशाइन व्हिलाज, गणेशयम सोसायटी येथील तीन ठिकाणी याची अंमलबजावणी सुरु आहे. येथे वाहन उभे करण्यासाठी तासाप्रमाणे शुल्क आकारले जाते. त्याची दररोज पावती फाडावी लागते. त्यात नागरिकांचा वेळ जातो. त्यामुळे महापालाकिने ‘व्हॉट्सअॅप पार्किंग’ डिजिटल सेवा सुरु केली आहे.

कशी करणार नोंदणी?

महापालिकेने ८६२४९२५९३४ हा क्रमांक प्रसिद्ध केला आहे. त्यावर ‘हाय’ असा संदेश पाठविल्यानंतर आगाऊ नोंदणी करण्यासाठी कोणती प्रक्रिया करायची याची माहिती येते. तसेच पैसे भरण्यासाठी स्कॅनरही येतो. ही नोंदणी वापरकर्त्याच्या नावाने निश्चित वेळेसाठी ठेवली जाणार आहे. वाहन वेळेत पार्क न केल्यास वापरकर्त्याला तत्काळ सूचना पाठवली जाते. ती जागा पुढील नागरिकासाठी खुली केली जाते. शहरातील दहा ठिकाणी ही सुविधा कार्यान्वित झाली आहे.

किती आहे शुल्क?

दुचाकीसाठी एका तासाला पाच रुपये, चारचाकीला दहा रुपये, रिक्षा, टेम्पोला १५ रुपये, बससाठी एका तासाला ५० रुपये असे शुल्क आकारले जाते. एखाद्या नागरिकाला दिवसभरासाठी दुचाकी पार्क करावी लागते. त्यामुळे मासिक पास देण्याचे नियोजन सुरु आहे. पासधारकांना २० ते ३० टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डिजिटल सेवेमुळे कागदपत्रे किंवा तिकिटाची गरज पडणार नाही. प्रत्यक्ष माहिती आणि आरक्षण स्थिती ‘व्हॉट्सअॅप’वर मिळणार आहे. त्यामुळे पार्किंग प्रक्रियेत सुसूत्रता आणि वेळेचा अपव्यय टळणार आहे. नागरिकांचा वेळ वाचणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेतही सुधारणा होईल, असा दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या दळणवळण विभागाचे सह शहर अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी केला.